मुंबई – नुकतेच शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी बैठक झाली. या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु माध्यमांमध्ये शरद पवार-अजितदादा भेटीची बातमी पसरली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ माजली. काका-पुतण्याच्या या भेटीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त करत शंकाही उपस्थित केली. त्यात आता अजित पवारांच्या या भेटीत भाजपाकडून शरद पवारांना २ मोठ्या ऑफर दिल्याचा दावा काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे म्हटलं आहे. चव्हाण यांनी दावा केला की, माझ्या माहितीनुसार, शरद पवारांना केंद्रात कृषी खाते आणि निती आयोगाचे चेअरमनपद अशा २ ऑफर अजितदादांसोबतच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु शरद पवारांनी या दोन्ही ऑफर नाकारल्या असं त्यांनी सांगितले. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून आतापर्यंत ३-४ वेळा या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. शरद पवारांना एनडीएकडे वळवावे अशी यामागची भाजपाची रणनीती असल्याचे दिसून येते.
इतकेच नाही तर जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनाही सामावून घेण्यासाठी शरद पवारांना ऑफर दिली. अलीकडेच अजित पवारांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यातून शरद पवारांना ही ऑफर कळवावी असा निरोप अजितदादांना देण्यात आला. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी फूट पाडणाऱ्या भाजपा शरद पवारांना सोबत घेऊन महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आणखी राजकीय स्पेस घेण्यासाठी उत्सुक आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
सूत्रांनुसार, शरद पवार यांना सोबत घेण्यासाठी दबावतंत्राचे राजकारण भाजपाकडून खेळले जात आहे. कारण पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचे बहुतांश नेते आता अजित पवारांसोबत गेले आहेत. अनेकांनी शरद पवारांची साथ सोडून सत्तेत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शरद पवारांनी येवल्यानंतर अन्य कुठेही मेळावे, सभा घेतल्या नाहीत. माझा फोटो वापरू नका पवारांनी अजितदादा गटाला सांगितले असले तरी आजही अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसतात. त्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठीमुळे संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीत कुठेही फूट पडली नाही, सर्वच शरद पवारांना मानतात. त्यांचे फोटो लावतात असं विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं चाललंय काय असा सवाल अनेकांच्या मनात पडला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
महाविकास आघाडीमध्ये आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपाबाबत आमची देश आणि राज्य पातळीवर भूमिका स्पष्ट आहे. भाजपाशी सबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध असण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलेही संभ्रमाचे वातावरण नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांच्यासोबत आमचा कसलाही संबंध नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारुन संभ्रम तयार करु नका असं शरद पवारांनी म्हटलं.