ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 24 - हरंगुळ (बु.) परिसरात असलेल्या वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आलेली तूरडाळ व तूर अशा एकूण २ कोटी १० लाख ७८ हजार ५०० रुपयांचा माल परस्पर विकून फसवणूक केल्याची घटना रविवारी घडली. याबाबत वेअर हाऊस चालक हेमंत वैद्य यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील सुभेदार रामजी नगर येथील व्यापारी अतिश सुग्रीव जाधव (२५) यांनी हरंगुळ (बु.) परिसरातील किसान वेअर हाऊस कळंब रोड येथे १११६ क्विंटल तूरडाळ व १०० क्विंटल तूर असा एकूण २ कोटी १० लाख ७८ हजार ५०० रुपयांचा माल ठेवला होता. मात्र या धान्याची विक्री अतिश जाधव यांना कसलीही माहिती न देता वेअर हाऊसचे चालक हेमंत जयंत वैद्य यांनी परस्पर केली. दरम्यान, जाधव यांनी गोडावूनमध्ये ठेवलेल्या धान्याची विचारणा केली असता ‘तुम्ही आमच्याकडे आल्यास गोळ्या घालून ठार मारीन’, अशी धमकीही जाधव यांना हेमंत वैद्य यांनी दिली, असे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वेअर हाऊस चालक हेमंत वैद्य (रा. किसान मित्र वेअर हाऊस, कळंब रोड, हरंगुळ बु. ता. लातूर) यांच्याविरुद्ध कलम ४०६, ४०७, ४२०, ५०६ भादंविप्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. सुधाकर बावकर करीत आहेत.