नागपूर - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची ताकद महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहे. याआधी राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. आता भाजपाच्या २ माजी आमदारांनी BRS चा झेंडा हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील नागपूरात बीआरएस पक्षाचे पहिले कार्यालयाचे उघडण्यात आले आहे. लवकरच राज्यभरात ठिकठिकाणी बीआरएस पक्षाचे कार्यालय होईल असं पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
भाजपाचे राजू तोडसाम, चरण वाघमारे या विदर्भातील २ आमदारांनी के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. यावेळी चरण वाघमारे म्हणाले की, भाजपाचं राष्ट्रवादीवर जास्त प्रेम आहे. आमच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत युती न केल्यानं भाजपाने मला काढले. जनतेच्या सन्मानासाठी, भाजपा मैदानात असे आम्ही नारे देत होतो. आम्हाला वाटायचे भाजपात लोकशाही आहे. परंतु आमची तिकीट कापली गेली तेव्हा वाटले जनतेच्या अपमानासाठी भाजपा मैदानात अशी स्थिती झाली आहे. आम्ही बीआरएस पक्षाकडून निवडणुका लढणार आहोत असं त्यांनी सांगितले.
तर शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात. हा कलंक आपल्याला पुसायचे असेल तर केसीआर यांनी ज्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी तेलंगणात आणल्या त्या याठिकाणी राबवायला हव्यात या उद्देशाने आम्ही भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. भाजपा सक्रीय नेत्यांच्या तिकीट कापते हे दिसून येते असं माजी आमदार राजू तोडसाम यांनी म्हटलं. त्याचसोबत माजी आमदार दीपक आत्राम यांनीही बीआरएस पक्षाचे कौतुक करत जास्तीत जास्त कार्यकर्ते या पक्षात येतायेत असं म्हटलं. नागपूरात बीआरएस पक्षाचे पहिले कार्यालय असून त्याचे उद्धाटन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत मिळत नाही. बीआरएस पक्ष राज्यात सत्तेत आल्यानंतर तेलंगणात ज्या काही योजना होतायेत त्या महाराष्ट्रात राबवल्या जातील. त्याचा फायदा लोकांना होईल असं माजी आमदार दीपक आत्राम म्हणाले. तर नागपूरात बीआरएस पक्षाची सदस्य नोंदणी सुरू असून केसीआर यांना समर्थन देण्यासाठी लोक जास्त गर्दी करतायेत. भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून लोकांना लुटले असा आरोपही माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला.