रत्नागिरी: नाणार रिफायनरीवरून घेतलेला यू-टर्न शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत नाराजी आहे. याच नाराजीचा फायदा घेण्यासाठी भाजपनं मेगाप्लान आखला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. या मिशनची जबाबदारी चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
नाणार रिफायनरीला शिवसेनेला विरोध होता. मात्र आता शिवसेनेची भूमिका बदलली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तसं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी भाजपनं व्यूहनीती आखली आहे. आशिष शेलार, प्रसाद लाड, नारायण राणे, निलेश राणेंकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नाणारसंदर्भातील भूमिका उद्धव ठाकरेंनी बदलल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची कोंडी झाली आहे. ठाकरेंनी विश्वासात न घेतल्याची आणि पक्षात साईड लाईन केल्याची भावना शिवसेना नेत्यांमध्ये आहे. या नेत्यांशी भाजपनं संपर्क साधला आहे. शिवसेनेचे दोन माजी मंत्री आणि एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मिशन कोकण हाती घेतलं आहे. शिवसेनेला नाराज नेत्यांना गळाला लावण्याची तयारी भाजपनं केली आहे. या नेत्यांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या यशस्वी झाल्याचं समजतं. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजप मिशन कोकण हाती घेईल. त्यानंतर योग्य वेळी शिवसेनेचे नाराज नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.