मुंबई : एसटीत मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे सध्याच्या मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. हे पाहता, एसटीत १४ हजार २४७ विविध पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जानेवारीपासून पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल २ लाख ४0 हजार अर्ज एसटीकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. २१0२ आणि २0१४मध्ये एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. त्यानंतर, महामंडळात भरती प्रक्रिया झाली नाही. दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या. एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २0 हजार जागा मंजूर असून, सध्याच्या घडीला १ लाख ५ हजारांपर्यंत मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे या पदांमध्ये कोकण विभागासाठी (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर) सर्वाधिक ७ हजार ९२३ चालक, तसेच वाहकांची भरती केली जाईल, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ हजार ५४८ लिपिक, ३ हजार २९३ सहायक व ४८३ पर्यवेक्षकांची भरती करण्यात येईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून, त्याची अंतिम मुदत ३ फेब्रुवारीपर्यंत आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रिया ही आॅनलाइन असून, त्याला १२ जानेवारीपासून सुरुवात होताच, तब्बल २ लाख ४0 हजार अर्ज एसटी महामंडळाला प्राप्त झाले. (प्रतिनिधी)
१४ हजार पदांसाठी २ लाख ४0 हजार अर्ज
By admin | Published: January 26, 2017 5:39 AM