यदु जोशी, मुंबईमॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत. हे विद्यार्थी कमी होण्याचा संबंध शिष्यवृत्ती घोटाळ्याशी लावला जात आहे. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयांची संख्या ३७३ ने घटली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांना त्यांच्याकडे अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटीचे किती विद्यार्थी आहेत, या बाबत आॅनलाइन नोंदणी करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले होते. १५ जानेवारी २०१६ पर्यंत ही नोंदणी करायची होती. त्यानुसार ११ हजार ७१२ महाविद्यालयांनी नोंदणी केली. त्यांच्याकडे वरील चार प्रवर्गातील १४ लाख १२ हजार ४६४ विद्यार्थी असल्याचे त्यांनी नोंदविले आहे. या आकडेवारीचा उपयोग स्कॉलरशिप देण्यासाठी केला जातो. गेल्या वर्षी (२०१४-१५) १२ हजार ८५ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती आणि त्यांच्याकडे वरील चार प्रवर्गातील १६ लाख ७७ हजार ६१० विद्यार्थी असल्याचे नोंदविले होते. यंदा ही संख्या २ लाख ६५ हजार १४६ ने कमी होऊन १४ लाख १२ हजार ४६४ वर आली आहे. या प्रवर्गातील केवळ एक विद्यार्थी असलेली तब्बल ४७५ महाविद्यालये आहेत. शिष्यवृत्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीची कोट्यवधी रुपयांनी लूट करण्यात येत असल्याचे नव्या सरकारच्या लक्षात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविणाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे विद्यार्थी संख्या २ लाख ६५ हजाराने कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. याची दुसरी बाजू अशीही आहे की, इतकी मोठी विद्यार्थी संख्या दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली अनेक संस्थाचालक वर्षानुवर्षे मलिदा खात होते. राज्यातील खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेजांनी बोगस प्रवेश व अन्य क्लृप्त्या करून गेल्या ५-६ वर्षांत सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा डल्ला मारल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात दिले होते. अल्पमुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करणार असलेल्या विशेष टास्क फोर्सकडेच पॉलिटेक्निक शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी दिली जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. अपर पोलीस महासंचालक के.व्यंकटेशम हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत.
२ लाख ६५ हजार विद्यार्थी गायब !
By admin | Published: January 19, 2016 4:00 AM