ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - देवनार कचरा डेपोला वारंवार लागणा-या आगीप्रकरणी पोलिसांनी २ मुख्य आरोपींना अटक केली असून रफीक व आतिक अशी त्या दोघांची नावे आहेत. यापूर्वीच पोलिसांनी एकूण १३ भंगार विक्रेत्यांना आग लावल्याप्रकरणी अटक केली होती, मात्र त्यांना आग लावण्यास सांगणा-या मास्टरमाईंडचा शोध लागत नव्हता. अखेर शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी रफीक व आतिकला अटक केली असून थोड्याच वेळात त्यांना कुर्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी भंगार विक्रेत्यांना जबरदस्तीने डंपिंग ग्राऊंडमध्ये आग लावण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघेही देवनार डंपिंग ग्राऊंडच्या आसपासच्या परिसरातच राहतात, असेही समजते.
भंगारातल्या वस्तू वेगवेगळ्या करण्यासाठी ही आग लावण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी देवनार डंपिंग ग्राऊंड परिसरातील जवळपास 25 ते 30 भंगार गोळा करणा-या मुला-मुलींसहीत भंगार विक्रेत्यांची चौकशी केली होती. या चौकशीतून भंगार विक्रेत्यांच्या सांगण्यावरून या आगी लावण्यात येत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आता त्यांना आग लावण्याची सूचना करणारे मुख्य आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.