मुंबई: महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी वेळोवेळी त्यांची नाराजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे बोलून दाखवली. यानंतर आता काँग्रेसचे तब्बल २० आमदार नाराज असल्याचं समजतं. या आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. भेटीसाठी वेळ देण्याची मागणी त्यांनी सोनिया गांधींकडे केली आहे.
पुण्यातले काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील राजकीय स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी भेट तुमची भेट घ्यायची असल्याचं थोपटेंनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रावर २० आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 'राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ४ किंवा ५ एप्रिल रोजी तुमची भेट हवी आहे. या दिवशी शक्य नसल्यास तुम्ही दिवस कळवा. माझ्यासोबत २० ते २५ आमदार असतील,' असं थोपटेंनी पत्रात म्हटलं आहे.
राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणतात...राज्यातील पक्षाच्या आमदारांनी सोनिया यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितलं. सोनिया यांच्याकडून अद्याप तरी भेटीसाठी वेळ देण्यात आलेली नाही. भेटीसाठी मीदेखील पाठपुरावा करत आहे. त्यामुळे लवकरच भेट मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस आमदारांच्या नाराजीची कारणं काय?- काँग्रेसच्या वाट्याचं विधानसभा अध्यक्षपद अनेक महिने उलटूनही मिळालेलं नाही.- निधीचं समान वाटप होत नसल्यानं नाराजी- आमदारांमध्ये पक्षाच्या काही मंत्र्यांबद्दल आकसाची भावना- नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या उर्जाखात्यावर आमदार असमाधानी- मंत्री सोबत घेऊन काम करत नसल्याची तक्रार- अडीच वर्षात तेच पालकमंत्री कायम- जिथे पालकमंत्री न्याय देत नाहीत, तिथे पालकमंत्री बदलण्याची मागणी