अनंत जाधव, सावंतवाडीरोहा ते मंगलोर या १९९०ला मंजुरी मिळालेल्या कोकण रेल्वेच्या ७६१ किलोमीटरपैकी २० किलोमीटरचा ठोकूर ते मंगलोर हा भाग दक्षिण रेल्वेने बळकावल्याने कोकण रेल्वेला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्रालयाला परिस्थितीजन्य पुरावे देत हा २० किलोमीटरचा भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली आहे. मात्र, तिला रेल्वे मंत्रालयाने केराची टोपली दाखविली. या प्रकरणी बंगलोर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांतून धावते. १९९०मध्ये रोहा ते मंगलोर अशा ७६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली; पण १९९८ ला कोकण रेल्वे पूर्णत: सुरू झाली, तेव्हा ७४१ किलोमीटरपर्यंतच धावू लागली. या रेल्वेचा ठोकूरपर्यंतचा भाग कोकण रेल्वेत घेण्यात आला, तर पुढील २० किलोमीटरचा भाग दक्षिण रेल्वेने काबीज केला. तत्कालीन रेल्वेचे अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रत्यक्षात कृतीत आणणारे ई. श्रीधरन यांनीही १९९८ ला रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून ठोकूर ते मंगलोर बंदरपर्यंतचा दक्षिण रेल्वेला जोडलेला भाग पुन्हा कोकण रेल्वेला जोडला जावा, अशी मागणी केली होती.
२० किलोमीटरला फाटा, ‘कोरे’ला घाटा!
By admin | Published: February 25, 2015 1:36 AM