ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. 15 - मध्यप्रदेशातील जबलपूर येथून गोंदियाकडे येत असलेल्या एका छत्तीसगड पार्सिंगच्या इनोव्हा कारमधून एक हजार रुपयांच्या नोटांचे २० बंडल (२० लाख रुपये) जप्त करण्यात आले. ही कारवाई मध्यप्रदेश सिमेवरील रजेगावजवळच्या कोरणी नाक्यावर दुपारी २.३० वाजता भरारी व दक्षता पथकाने संयुक्तपणणे केली. ताब्यात घेतलेल्या गाडीतील तीन लोकांना त्या रकमेचा कोणताही हिशेब देता आला नसल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले.
येत्या १९ नोव्हेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार तेजीत आहे. या निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नेमलेल्या दक्षता पथकाचे प्रमुख ना.तहसीलदार सतीश मासाळ आणि भरारी पथकाचे प्रमुख ना.तहसीलदार सोमनाथ माळी मंगळवारी दुपारी कोरणी नाक्यावर मध्यप्रदेशातून येणाºया वाहनांची तपासणी करीत होते. याचवेळी सीजे ०४/एच ६४२९ या छत्तीसगड पासिंगच्या इनोव्हा कारमधील मागील सीटवर एका बॅगमध्ये २० लाख रुपये आढळले. हे पैसे कशाचे आहेत याची चौकशी केली मात्र गाडीमधील लोक त्याबाबत माहिती देण्यास असमर्थ ठरले. जबलपूरवरून येत असून राजनांदगावकडे जात आहे असे त्यांनी सांगितले. मात्र पैशाच्या बाबतीत त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांची गाडी जप्त करून ती रक्कम गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्याकडे आणण्यात आली. तिथे चौकशी केल्यानंतर ती रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली.
त्या गाडीत पियुषकुमार प्रकाशचंद चौबे (४९), रा.वर्धमान नगर, राजनांदगाव (छत्तीसगड), यशवंतकुमार धनीराम जंघेल (२६) रा.चिखली (जि.राजनांदगाव) आणि गाडीचालक संतोष निसार (३३) रा.राजनांदगाव हे तिघे होते. त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी आयकर विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती.
ही कारवाई दक्षता व भरारी पथकातील मंडळ अधिकारी बी.डी.भेंडारकर, तलाठी आर.एस.बोडखे, सोनवणे, नायक पोलीस अइनल पटीये, रविशंकर तरोणे, रुपेंद्र गौतम आणि नितीन तरारे यांनी केली.
आमदाराचा फोन स्वीकारला नाही...
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकाºयांच्या कक्षात चौकशी सुरू असताना त्या गाडीतील एका व्यक्तीच्या मोबाईलवर जिल्ह्यातील एका आमदाराचा फोन आला. त्यांनी कारवाई करणा-या पथकातील अधिका-यांसोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र अधिका-याने आमदारांशी बोलण्यास नकार दिला.