ठाणे : घोडबंदरच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी तेही अवघ्या सात रुपयात २० लीटर इतक्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. याचा लाभ आजूबाजूच्या सोसायटींसह झोपडपट्टी परिसराला होणार आहे. ठाणे महापालिका, वॉटर लाईफ इंडिया आणि डिटो फाउंडेशनतर्फे या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. ठाणे महापालिकेने दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली होती. त्याला आज प्रत्यक्ष सुरूवात झाली. यावेळी डिटो फाऊंडेशन आणि वॉटर लाईफ इंडियाचे झेंडर वॅन मिरविझिक, शहाना भौमिक, सुदेश मेनन, इंद्रायणी दास, मोहन रानबोअरे, भावना मनोहर डुंबरे आणि स्थानिक नगरसेविका बिंदु मढवी आदी उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नातून आणि महापालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे ठाण्यातील १० मधील पहिला प्रकल्प हा विजयनगरी भागात सुरु झाला आहे. बोअरवेलमधील पाणी येथील फिल्टरेशन प्लॅन्टमध्ये टाकले जाते आणि ते शुध्द करुन पाण्याच्या टाकीत सोडले जाते. येथे पाणी घेण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना स्मार्ट कार्ड स्वॅप करुन पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या प्रक्रियेनंतर दररोज २४ हजार लीटर पाणी या टाकीत उपलब्ध होणार असल्याची माहिती अर्पण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी दिली. तसेच स. ७ ते दु. १२ आणि सायं. ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथे पाणी उपलब्ध होईल. ३५ पैशांत एक लीटरहा पहिला प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आझादनगर, कळवा-मनीषा नगर, अकलेश्वर नगर आदींसह इतर १० ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डिटो फाऊंडशेनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे बाजारात एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मोजावे लागतात. परंतु येथे अवघ्या ३५ पैशात एक लीटर पाणी नागरिकांना उपलब्ध झाले आहे. आता हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील इतर ठिकाणी देखील हे प्रयोग राबविले जाणार आहेत.
सात रूपयांत २० लीटर शुध्द पाणी
By admin | Published: June 08, 2016 5:03 AM