NCP चे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, ते खोटे नाही; जयंत पाटील स्पष्ट बोलले
By अविनाश कोळी | Published: April 27, 2023 07:38 PM2023-04-27T19:38:14+5:302023-04-27T19:39:10+5:30
अजित पवार आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही, मुख्यमंत्रिपदासाठी नंबर येत नाही, तोपर्यंत चर्चा कशाला? असंही जयंत पाटील म्हणाले.
सांगली - पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते अजित पवार किंवा अन्य कोणाशीही माझी स्पर्धा नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेबद्दल राज्यभर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याने मुख्यमंत्री व्हावे, जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. कोल्हे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना ऊत आला. राष्ट्रवादीअंतर्गतही उलटसुलट चर्चा सुरू होती. यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वात विधिमंडळात आमचे आमदार एकसंधपणे कार्यरत आहेत. पुढील काळात आमचा पक्ष कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत त्याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर एकमताने चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही.
खासदार अमोल कोल्हे यांनी केलेले ते विधान प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होते. मात्र, उद्देश काही नाही. अजित पवारांशी किंवा पक्षात कोणाशीही माझी स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या आवश्यक बहुमत असल्याचे अजित पवार आणि आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही. राज्यभरात विविध प्रकारची पोस्टर झळकली तरी उत्साही कार्यकर्त्यांच्या त्या अपेक्षा असतात.
मुख्यमंत्रीच माझ्या संपर्कात
मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे सेनेतील उर्वरित आमदार व राष्ट्रवादीचे २० आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, एकमेकांच्या संपर्कात सगळेच असतात. तसे एकनाथ शिंदेही माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात ते खोटे नाही!
पुढची स्वप्ने पाहू नयेत
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार व्यवस्थित सांभाळत आहेत. मला पक्षाची जबाबदारी दिली असून ती मी सांभाळत आहे. पक्षाची ताकद वाढल्याशिवाय व पक्ष मोठा झाल्याशिवाय पुढची स्वप्ने कोणी बघू नयेत, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.