पुणे : चीनमधील वुहान प्रांतातून प्रसरलेल्या कराेना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची देखील प्रशासनाकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. चीनमधील बाधित भागातून 107 प्रवासी आले असून 18 जानेवारी पासून त्यापैकी 21 जणांना ताप, सर्दी, खाेकला अशी लक्षणे आढळल्याने त्यांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले हाेते. त्यापैकी 20 जाणांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आले असून एकाचा रिपाेर्ट उद्यापर्यंत प्राप्त हाेणार आहे.
3 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11093 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 107 प्रवासी आले असून 18 जानेवारी पासून त्यापैकी 21 जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी 20 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून उरलेल्या एक जणाचा प्रयोगशाळा निकाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. 21 भरती झालेल्या प्रवाशांपैकी 19 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सध्या नायडू रुग्णालयात 1 आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 1 रुग्ण भरती आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणा-या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरता करण्यात येतो आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 107 प्रवाशांपैकी 39 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.