- अतुल कुलकर्णी, मुंबईबहुचर्चित महानंद दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६७ अर्जांपैकी अनेकांनी अर्ज मागे घेतल्याने २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यात बिनविरोध निवडून आले आहेत.निवडणुकांच्या संदर्भात महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी बैठका झाल्या. जर हरिभाऊ बागडे यात राहणार असतील, तर संचालक मंडळावर दबाव राहील आणि यापुढे तरी काम निट पार पडेल, असा सूर त्यात निघाला. राज्यात महानंदचे ८ मतदारसंघ आहेत. त्यातून २१ उमेदवार निवडून येतात. एकूण मतदार ६२ आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे ३० ते ३२ तर काँग्रेसचे १५ ते १६, भाजपाचे १० ते १२ शिवसेनेचे २ व तटस्थ अशी विभागणी होती. पश्चिम महाराष्ट्रात ११ अर्जांमध्ये चार वगळता सगळ्यांनी अर्ज मागे घेतल्याने विष्णू हिंगे, ज्ञानेश्वर पवार, पाटील विनायक धोंडिबा, जगदाळे शंकरराव बिनविरोध निवडून आले.मराठवाड्यातील चार जागांसाठी ११ अर्ज आले होते. त्यात हरिभाऊ बागडे, राजेंद्र सूर्यवंशी, रामकृष्ण बांगर, विलास बडगे बिनविरोध आले तर विदर्भातील चार जागांसाठी ८ अर्ज होते. त्यात चौघांनी अर्ज मागे घेतल्याने निळकंठ कोडे, राजेंद्र ठाकरे, दयाराम कापगते आणि विलास काटेखाये बिनविरोध आले.उर्वरित महाराष्ट्रातील चार जागांसाठी १३ अर्ज आले होते. त्यापैकी ९ अर्ज मागे घेतले गेल्याने प्रशांत गडाख, विक्रमसिंह रावळ, चंद्रकांत रघुवंशी, राजेश परजणे बिनविरोध आले तर महिलांसाठीच्या दोन जागांसाठी ८ अर्ज होते. त्यातील ६ अर्ज मागे घेतले गेले व प्राजक्ता सुरेश धस आणि मंदाकिनी खडसे बिनवरोध निवडून आल्या.- एसटीसाठीच्या एका जागेवर वैभव पिचड तर ओबीसीच्या एका जागेसाठी १० अर्ज आले होते त्यातून नऊ अर्ज मागे घेतले गेल्याने रणजितसिंह देशमुख विजयी झाले. व्हीजेएनटीच्या एका जागेसाठीचा तिढा सुटला नव्हता.
महानंदच्या २० जागा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 1:12 AM