पिंपरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे, खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे येत्या रविवारी (दि. २४) जिल्हास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन केले आहे. प्रत्येक कॅन्टोन्मेंट बोर्डात स्पर्धा होणार आहे. त्यात तब्बल २० हजार धावपटू सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनच्या माध्यमातून देशभक्ती, तंदुरुस्त भारत, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, पर्यावरण संवर्धन आदींचा संदेश दिला जाणार आहे. देशातील सर्व ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि लष्कराच्या वेगवेगळ्या विभागांना मिनी मॅरेथान शर्यतीचे आयोजन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. हे आदेश गेल्या महिन्यात दिले गेले आहेत. यानुसार पुण्यातील पुणे, खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या तीन वेगवेगळ्या मिनी मॅरेथॉनमध्ये प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी, खुला गट मुले व मुली, प्रौढ महिला व पुरुष असे गट आहेत. तसेच, व्हीलचेअर आणि विशेष मुलांचे गट आहेत. विजेत्यांना रोख रक्कम, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शर्यतीमध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच ज्येष्ठ नागरिक, लष्करी जवान, संरक्षण उद्योगातील कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेदरम्यान देशभक्ती, तदुंरुस्त भारत, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आदी वेगवेगळ्या विषयांवर संदेश देऊन जनजागृती केली जाणार आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. स्पर्धेसाठी अॅथलेटिक्स संघटनेचे तांत्रिक अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. लष्करी संस्था आणि संरक्षण उद्योग विभागाचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी तिन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे जय्यत तयारी केली जात आहे. या निमित्ताने स्पर्धेबरोबरच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
स्वच्छता संदेश देत २० हजार स्पर्धक धावणार
By admin | Published: January 20, 2016 1:13 AM