मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच कला महाविद्यालये यांमध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणांमुळे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिका तत्त्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत असून अशा अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ६२५ रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल. शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये मानधन मिळेल. उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ, ज्येष्ठ अभियंता यांच्या व्याख्यानासाठीचे मानधन एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये तर पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन ६०० रुपयांवरून एक हजार रुपये तर पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन ५०० रुपयांवरून ८०० रुपये असेल.
कला शिक्षण पदविका तसेच पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर ६२५ रुपयांवरून एक हजार प्रतितासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे, तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
रिक्त पदे भरणारविद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.