अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र सरकारच्या ‘उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलइडी फॉर आॅल’ (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या एलइडी बल्ब वितरण योजनेंतर्गत आता २० वॅटचे एलइडी ट्युबलाइट मिळणार आहेत. सध्या पुण्यात या ट्युबलाइटचे वितरण सुरू झाले असून, विदर्भात अकोला व नागपूर येथे पुढील आठवड्यात ही योजना लागू होणार आहे. एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी महाराष्ट्रात महावितरण या वीज कंपनीच्या सहकार्याने ही योजना राबवित असून, या योजनेंतर्गत पूर्वीच्या नऊ वॅटच्या एलईडी दिव्यांसोबतच २० वॅटचे एलईडी ट्युबलाइट देण्यात येणार आहेत.ईईएसएल या कंपनीने महाराष्ट्रात जुलै २०१५ मध्ये एलईडी दिवे वितरित करण्याची योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सुरुवातीला सात वॅट, तर नंतर नऊ वॅटचे एलइडी बल्ब प्रत्येकी केवळ ८५ रुपयांना वितरित करण्यात आले. बल्बच्या वितरणासाठी महावितरण आणि ईईएसएल यांच्यावतीने राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये वितरण केंदे्र उभारण्यात आली होती. या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळून लाखो एलइडी दिव्यांची विक्री झाली. दरम्यानच्या काळात या योजनेंतर्गत २० वॅटचे एलइडी ट्युबलाइट आणण्याचा प्रस्ताव ‘ईईएसएल’ कंपनीने राज्य सरकारपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, पुण्यात या ट्युबलाइटची विक्री सुरू झाली आहे. लख्ख उजेड देणारे हे एलइडी ट्युबलाइट केवळ २३० रुपयांत ग्राहकांना उपलब्ध होत आहेत. विदर्भात महावितरणच्या अकोला आणि नागपूर परिमंडळांतर्गत जिल्ह्यांमध्ये एलइडी ट्युबलाइटची विक्री पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती ‘ईईएसएल’मधील सूत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय नऊ वॅटचे एलइडी बल्बही पूर्वीप्रमाणे उपलब्ध राहणार आहेत.एजन्सी बदललीमहाराष्ट्रात एलइडी दिव्यांची विक्री करण्याचे कंत्राट ‘ईईएसएल’ने औरंगाबाद येथील एका एजन्सीला दिले होते. गत वर्षभरात या एजन्सीने विविध ठिकाणी एलइडी दिव्यांची विक्री महावितरणच्या कार्यालयांपुढे स्टॉल उभारून केली. या एजन्सीचा करार संपुष्टात आल्याने राज्यात अनेक ठिकाणी नऊ वॅटच्या एलइडी बल्बची विक्री थांबली होती. आता नवीन एजन्सीला कंत्राट देण्यात आले असून, ही एजन्सी २० वॅटच्या एलइडी ट्युबलाइटसोबतच नऊ वॅटच्या एलइडी बल्बचीही विक्री करणार आहे.एलइडी ट्युबलाइटचे वितरण सुरू करण्याबाबत अकोला येथील महावितरण अधिकाऱ्यांशी बोलणी झाली आहे. पुढील आठवड्यात अकोला व नागपूर येथे स्टॉल उभारून एलइडी ट्युबलाइटचे वितरण करण्यात येणार आहे. - दीपक कोकाटे, प्रादेशिक व्यवस्थापक, ईईएसएल, मुंबई.
आता २० वॅटचे एलइडी ट्युबलाइट!
By admin | Published: June 13, 2017 1:47 AM