अमरावती : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीचा एकूण खर्च २०० कोटींच्या घरात पोहोचल्याचा राजकीय क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. जुन्याजाणत्या आणि दिग्गज उमेदवारांचा प्रत्येकी खर्च आताच एक कोटीपर्यंत जाऊन पोहोचल्याचे खासगीत बोलले जाते. अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६२८ उमेदवार नगरसेवकपदासाठी आपले भाग्य आजमावित आहेत. एका-एका मतासाठी त्यांचा प्रचार युद्धस्तरावर सुरू आहे. मतदार-कार्यकर्त्यासाठी काढलेल्या सहलींसह अनेक मार्गांनी महापालिका निवडणुकीतील उमेदवार मतदार राजाला भुरळ घालत आहे. एका-एका मतासाठी वस्तूंची खिरापत सुरू असल्याने शहरातील खर्च किमान २०० ते २५० कोटींवर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. मात्र निवडणुकीचे पडघम दीपावलीपासून सुरू झाले. दीपावली पहाट, दिवाळी फराळ अन् भेटवस्तू वाटपास इच्छुकांकडून दोन महिन्यापूर्वीच सुरूवात झाली होती. त्यामुळेच उमेदवारी निश्चित करताना कोट्यवधी खर्च झालेत. भाजप, राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी सढळहाताने पक्षाला निधी दिल्याचे किस्से ऐकायला मिळत आहे. त्यानंतर निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली.
शहरातील २२ प्रभागातील ८७ जागांसाठी एकूण ६२८ उमेदवार उभे आहेत. त्यात प्रत्येक जागेवर सरासरी चार प्रमुख उमेदवार आहेत. यात ३४८ उमेदवारांपैकी किमान निम्मेजण प्रत्येकी करीत असलेल्या खर्चाची रक्कम ५० ते ७५ लाखांच्या घरात आहे. दीपावलीच्या निमित्ताने झालेला सुमारे ५० ते ७५ लाखांचा खर्च जमेस धरला, तर किमान २०० कोटी रुपयांपर्यंतचा धूर निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार काढत आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून अनेकांनी प्रचार कार्यालये थाटले आहेत. तेथेच न्याहारी, दुपार आणि रात्रीच्या जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांसाठी इंधनाचा पुरवठा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)भेटवस्तूद्वारे आपलेसे करण्याचा प्रयत्नपाच ते सहा मतांचा कोटा असलेल्या कुटुंबाकडे आवर्जून लक्ष दिले जात आहे. काहींना वस्तू आणि सढळहाताने मदत केली जात आहे. काल-परवा झालेल्या प्रकटदिन महोत्सवाला अनेक उमेदवारांनी सढळ हस्ते देणगी देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.खर्चासाठी सात लाखांची मर्यादा४निवडणूक आयोगाने 'ड' वर्ग महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ७ लाख रूपये निश्चित केली आहे. मात्र यात निवडणूक लढणे अवघड असल्याचे बहुतेक उमेदवारांनी खासगीत बोलताना स्पष्ट केले आहे. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने मतदार संख्याही २८ ते ३५ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे एका पक्षाचे चार उमेदवार २८ लाखांत निवडणूक खर्च कागदोपत्री बसवीत असले तरी प्रत्यक्षातील खर्च त्याहून अधिक प्रमाणात होत आहे.