ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 1- सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व अडचणीत सापडलेल्या रूग्णांना आधार देण्यासाठी भाजप सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी/कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून दोन वर्षात ५ लाख रूग्णांसाठी २०० कोटीचे अर्थसहाय्य केल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिली़लोकमंगल जीवक हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीराच्या उदघाटनाप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली़. राज्यात भाजपाने सत्ता स्थापन केल्यानंतर नव्या योजनांचा समावेश करण्यात आला़ या योजनेत गरजू व अडचणीत सापडलेल्या रूग्णांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू केले़ या कक्षाच्या माध्यामातून मागील दोन वर्षात राज्यातील ४७५ धर्मादाय रूग्णालयातून १८० कोटी रूपयांचे मोफत उपचार देण्यात आले आहेत़ कॅन्सर, हार्टअटॅक, मेंदूरोग, किडनी, एडस आदी गंभीर आजारावर ही मदत देण्यात आली़ सर्वाना सुरळीत व विना अडचण रूग्णसेवा मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आता आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढे बोलताना शेटे म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे काम नियमित वाढत आहे़ वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी हजारो रूग्ण प्रयत्न करीत आहेत़ या गरजूना मदत व्हावी व कक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: प्रयत्न करीत आहेत़ पुढील काळात विनाअडचण सर्व रूग्णांना उपचार वेळेत मिळतील यासाठी प्र्रयत्न करणार आहोत असेही शेटे यांनी सांगितले़ यावेळी आ़ सुभाष देशमुख, भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राजेंद्र मिरगणे, लोकमंगल बँकेचे संचालक अविनाश महागांवकर, इंद्रजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
५ लाख रुग्णांसाठी २०० कोटींचे अर्थसहाय्य
By admin | Published: June 01, 2016 3:51 PM