भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने तेव्हाही आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:41 AM2020-01-20T00:41:45+5:302020-01-20T00:45:19+5:30
शिवसेनेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला मोठा गौप्यस्फोट
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली महायुती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, शिवसेनेने यावेळीच नाहीतर 2014 मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आले. मात्र त्यावेळची परिस्थिती विचारात घेऊन आपण हा प्रस्ताव फेटाळून लावला होता, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती उघड केली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या आघाडीबाबत चव्हाण यांनी यावेळप्रमाणेच पाच वर्षांपूर्वीसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव आला होता, असे सांगितले ते म्हणाले की, ''त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकार स्थापन झाले होते. तर भाजपाविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपाला सत्तेतून दूर करावे, असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मी फेटाळून लावला होता.''
''राजकारणात जय पराजय होतच असतात. यापूर्वीही असे पराभव झाले होते. त्यानंतरही आम्ही विरोधी पक्षात बसलो होतो. असे परखड मत नोंदवून मी तेव्हा आघाडीचा प्रस्ताव फेटाळला होता, असे चव्हाण यांनी सांगितले. 2014 नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपाने प्रयत्न केले. अशा परिस्थिती भाजपाकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी पर्याची सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजपा आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.