मुंबई: राजकारणात या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या आयाराम-गयाराम मंडळींच्या राजकारणाने 2019 च वर्ष गाजल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. तर या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यावेळी मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. त्यामुळे 2019 चे वर्ष आयाराम-गायारामांनी गाजल्याची विशेष नोंद भविष्यात राहणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मोठ्याप्रमाणावर गळती लागली होती. रात्री एका पक्षात तर सकाळी दुसऱ्या पक्षात नेते असल्याच्या बातम्या पाहायला मिळाल्या. मात्र यात काही महत्वाच्या नेत्यांची अधिकच चर्चा झाली.
सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सुद्धा बोलले जात होते. मात्र पुढे झालेल्या पोटनिवडणूक त्यांचा पराभव झाला.
तर विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाची साथ सोडून हाती कमळ घेतले होते. ते पक्ष सोडण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मात्र खासदार सुजय विखे पाटील लोकसभेत निवडून येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे थेट विरोधी पक्षनेताच फुटल्याने विखेंच्या पक्षप्रवेशाची सुद्धा राज्यभरात चर्चा रंगली होती.
याच बरोबर रश्मी बागुल,वैभव पिचड,जयदत्त क्षीरसागर,हर्षवर्धन पाटील,गोपीचंद पडळकर, अब्दुल सत्तार, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, राणा जगजितसिंह पाटील,नमिता मुंदडा,भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वता:चा पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे 2019 चा वर्ष हे आयाराम-गयारामांनी गाजल्याचे पाहायला मिळाले.