मुंबई : अहमदनगरमधील एक कोटीच्या लाच प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच लाचखोरीच्या कारवाईत अडकलेले राज्यभरातील २०२ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. त्यांच्यावर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा झालेल्या १६ जणांवर बडतर्फीची कारवाईही झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आणि प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे लाचखोर खुर्चीवर ठाण मांडून बसल्याचे धक्कादायक वास्तव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून सामोरे आले आहे. यात नागपूरच्या लाचखोरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊन देखील २०२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक (५८) लाचखोरांसह मुंबईतील ३४ जणांचा समावेश आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार ग्राम विकास (५९) , शिक्षण, क्रीडा (४८), महसूल/नोंदणी/ भूमी अभिलेख (१८), सहकार पणन व वस्त्रोद्योग (६), नगर विकास (२७) आणि पोलिस, होमगार्ड आणि कारागृह विभागातील (१८) जणांचा समावेश आहे. तर, अन्य विभागांतील प्रत्येकी १ ते ४ जणांचा समावेश आहे.
वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे... गेल्या वर्षी लाचखोरीच्या प्रकरणात राज्यात ७४९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार ३४ आरोपी पकडले गेले. या वर्षी २ नोव्हेंबरपर्यंत ७११ गुन्ह्यांची नोंद होत १ हजार ३० जणांवर एसीबीने कारवाई केली. पण, लाचखोरीला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने लाचखोरांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हे लाचखोर वर्षानुवर्षे तेथेच चिकटून आहेत.
कुठल्या परिक्षेत्रातील किती लाचखोर खुर्चीतपरिक्षेत्र लाचखोर मुंबई ३४ठाणे १७पुणे ११नाशिक १३नागपूर ५८अमरावती ३१छत्रपती संभाजीनगर २१नांदेड १७एकूण २०२