लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. २०२० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे परिषदेचे ध्येय आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.रावते यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती; या वेळी दिवाकर रावते बोलत होते. बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, अपर पोलीस महासंचालक आर.के. पद्मनाभन, प्रभारी परिवहन आयुक्त रणजितसिंह देओल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सहआयुक्त अमितेशकुमार उपस्थित होते. परिषदेत राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन दल, उत्पादन शुल्क आदी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.राज्यात ५७ कोटी रुपये रस्ते सुरक्षा निधी जमा झाला आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांसाठी हा निधी वापरावा, असा आदेश मंत्र्यांनी परिवहन आयुक्तांना दिला आहे. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अवजड वाहनांसाठी वाहनचालकांची वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
२०२० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी करणार
By admin | Published: June 19, 2017 2:36 AM