- स्नेहा मोरे
मुंबई : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्यात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात आले. या अभियानात ७१ हजार २९७ सदस्यांचे शोधपथक कार्यरत होते. या चौदा दिवसांच्या मोहिमेत राज्यात २ हजार ११८ कुष्ठरोगींची नोंद झाली आहे, यात राज्यभरात २०३ बाल कुष्ठरोगी आढळले आहेत. या रुग्णांवर आरोग्य विभागातर्फे त्वरित उपचार केले जातात.या अभियानात पालघर जिल्ह्यात ३८ बालकुष्ठरोगी आढळले आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये ३२ तर रायगडमध्ये २२ बालकुष्ठरोग्यांची नोंद झाली. रायगडमधील एका बालकुष्ठरोग्यात व्यंग असल्याचेही आढळून आले आहे.मुंबई आणि पुणेसारख्या मेट्रो शहरातही प्रत्येकी तीन बालकुष्ठरोगी आढळले आहेत. या अभियानाविषयी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, मुंबईत १७ हजार संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात २३ कुष्ठरोगी आढळले, त्यात ३ बालकुष्ठरोगींचा समावेश आहे. मोहिमेत आढळलेल्या कुष्ठरोगींवर उपचार केले जातात, उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.याविषयी राज्याच्या क्षयरोग व कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालिका डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले की, समाजातून कुष्ठरोग दूर करण्यासाठी अशा मोहिमा राबविल्या जातात. त्याद्वारे कुष्ठरोगी शोधून त्यांना त्वरित उपचार दिले जातात. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो. कुष्ठरोग हा काही स्पर्शाने होणारा आजार नाही. या रोगाचे निदान व उपचार सर्व सरकारी दवाखान्यांत तसेच आरोग्य केंद्रामध्ये मोफत केले जातात. वेळेत निदान व उपचाराने कुष्ठरोग पूर्ण बरा होतो. पुढे निर्माण होणाऱ्या शारीरिक विकृतीपासून बचाव होतो. कुष्ठरोगाच्या तीव्रतेनुसार त्याचा उपचार सहा महिने किंवा बारा महिने इतका आहे.