खामगाव : साप म्हटले की, कुणाच्याही अंगावर शहारे येतात. साप विषारी असो की बिनविषारी त्याची शहानिशा न करताच माणुस घाबरुन जातो. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात गतवर्षात २0६ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याचे दिसुन आले आहे. यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक प्रमाण आढळुन येते. खामगाव शहरालगत असलेल्या जंगलाचा काही भाग कमी झाला असून त्या ठिकाणी नागरीकांच्या वस्त्या तयार झाल्या आहेत. तर ग्रामीण भागातही आता जागा अपुरी पडु लागली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर असलेली ठिकाणे नष्ट झाली आहे. सरपटणार्या प्राण्यांचे बीळ नष्ट होऊन अनेक प्राणीदेखील नष्ट होत आहेत. पुर्वी त्यांचा या ठिकाणी मुक्त वावर असायचा. आता मात्र मानवाने त्यावर अतिक्रमण केल्याने त्यांना फिरायला जागा राहीलेली नाही. परिणामी अचानक दिसणार्या सापांमुळे नागरिक भयभयीत होतात. वेळप्रसंगी दंश होण्याच्या घटना घडतात. शहरासह सभोवतालच्या परिसरात साप दिसतात. काही ठिकाणी साप पकडुन सर्पमित्र त्यांना जंगलातही सोडतात काही साप मारल्याही जातात. खामगाव परिसरात सापांच्या १८ ते २0 प्रजाती आतापर्यंत आढळुन आल्या. त्यापैकी ४ प्रजातीचे साप विषारी आहेत तर काही साप निमविषारी व बिनविषारी आहेत. उन्हाळा व पावसाळ्यात प्रजननासाठी साप जागा शोधतो.अशावेळी बिळाच्या बाहेर निघुन ते अन्नाचा शोध घेतात. अशा घटना ग्रामीण भागत अधिक दिसुन येतात. ऐन साप यादरम्यान बाहेर निघत असतांना मानवाची व त्याची अचानक सर्पदंशाच्या घटना घडतात. तर शेतकरी शेतीचे कामे करीत असतांना सर्पदंश झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील वर्षभरात खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २0६ रुग्ण दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत. या दिवसात अशा घटनात वाढ होते. (प्रतिनिधी)
वर्षभरात २0६ सर्पदंश
By admin | Published: June 07, 2014 11:22 PM