पुणे : पर्यावरणाचे रक्षण आणि विकास या धोरणाला अनुसरूनच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २१ महिन्यांमध्ये राज्यातील सार्वजनिक आणि लोकोपयोगी अशा २४ प्रकल्पांना मान्यता दिली असून, पर्यावरणाला धक्का न पोहोचविता ही मंजुरी कशी देण्यात आली, याचा लेखाजोखा मांडणारी श्वेतपत्रिका लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, कोस्टल रोड, अमरावती विमानतळ, मुंबई हार्बर लिंक रोड, माळढोक अभयारण्य संरक्षित क्षेत्र कमी करणे, सांगलीतील पवनऊर्जा प्रकल्पास मंजुरी अशा २४ प्रकल्पांना या कालावधित मान्यता देण्यात आली आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार असतानाही अरबी समुद्रातील महाराजांच्या स्मारकाला सीआरझेडमुळे मंजुरी मिळाली नव्हती, याबाबत आम्ही योग्य ती पाहणी करून धोरणात्मक निर्णय घेतला, असे जावडेकर म्हणाले. पर्यावरण मंत्रालयाकडे सात ते आठ वषार्पासून रेंगाळलेल्या ११ खाणींनाही मान्यता दिली. तसेच उद्योकांकडून सामाजिक वनीकरणासाठी आलेला निधी हा दहा वर्षे बँकेमध्ये पडून होता. त्यातील ४० हजार कोटी प्रत्यक्ष वनीकरणासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्याचबरोबर मुळा मुठा शुद्धीकरण हा एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, त्यासाठी यंदा अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२१ महिन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढणार
By admin | Published: March 14, 2016 2:41 AM