भीमगोंडा देसाई , कोल्हापूरकेंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्पायर अॅवॉर्ड योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतून राज्यातील २१ विद्यार्थ्यांची जपान दौऱ्यासाठी निवड झाली आहे. येत्या मे महिन्यात ते जपानला जाणार असून तेथील प्रगत सायन्स आणि तंत्रज्ञानाची विद्यापीठे, इन्स्टिट्यूट यांना ते भेट देतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरील तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गात त्यांना सहभागी होता येईल.विज्ञान, तंत्रज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढावी, वैज्ञानिकदृष्टी वाढून शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी ‘इन्स्पायर अॅवॉर्ड योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून विविध पातळ््यांवर स्पर्धा घेण्यात येतात. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ही संकल्पना मांडली होती. विज्ञान व तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपकरण तयार करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धांमध्ये सहावी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात दिल्लीत झालेल्या स्पर्धेत कसबा आरळे (ता. करवीर) येथील माध्यमिक विद्यालयातील सुरेश जयंत पवार याने तयार केलेली ‘आधुनिक बैलगाडी’, कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूलच्या यश विजय अंबोळे याने तयार केलेली ‘दुर्बीण’ तर शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या अनुप योगेंद्र कुलकर्णी याने तयार केलेला ‘यांत्रिकी ऊर्जा निर्मिती यंत्र’ही उपकरणे मांडण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे या तिघांची जपान दौऱ्यासाठी निवड झाली आहे. सकुरा एक्स्चेंज प्रोग्रॅम आॅफ जपानच्यावतीने या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या तिघांसह राज्यातील २१ जण मेमध्ये ९ ते १६ आणि १६ ते २३ अशा दोन टप्प्यांत जपान दौऱ्यावर जाणार आहेत. हे विद्यार्थी बी.एस्सी., एम.एस्सी. झाल्यानंतर दरवर्षी ८० हजार रुपये, तर पीएच.डी. केल्यास एक लाख रुपये शिष्यवृत्तीही मिळणार आहे.
राज्यातील २१ विद्यार्थी जाणार जपान दौऱ्यावर
By admin | Published: February 09, 2015 5:08 AM