लोकमत ऑनलाइन/ चंद्रकांत जाधव
जळगाव, दि. 16 - देशातील केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे, पण भौगोलिक उपदर्शन (जीआय अर्थात जीआॅग्रॉफीकल इंडिकेशन) नसल्याने या केळीची वाताहत झाली. ही बाब लक्षात घेता जळगावच्या केळीला युरोप, आखाती राष्ट्रांची द्वारे खुली व्हावीत यासाठी तब्बल साडेतीन वर्षे अथक परिश्रमानंतर जळगावच्या केळीला जीआय मानांकन मिळाले आहे. केळीप्रमाणेच भरीताच्या वांग्यांनाही जीआय मानांकन मिळाले आहे.
राज्यात आज फक्त २२ कृषी उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले. त्यात फक्त जळगाव व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन उत्पादनांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील पाच वर्षे ५० हजार हेक्टरपर्यंत केळीची सरासरी लागवड झाली. देशाच्या केळी उत्पादनात जळगावचा वाटा १६ टक्के आहे. पण निर्यातीबाबत फारसी प्रगती झाली नाही. पंजाब, दिल्ली, मुंबईपर्यंतच केळी पाठविण्यात येत होती. देशात उत्तर प्रदेश, छत्तीसगढ नव्हे तर सेव्हन सिस्टर राज्यांतही केळीची लागवड होऊ लागल्याने जळगावच्या केळीची मागणी कमी झाली. जळगावच्या केळीत फायबर अधिक आहे. तापी व गिरणा खोऱ्यातील गाळाच्या जमिनीत रसायनांच्या कमी वापरात केळी उत्पादन घेण्याचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांनी जपले. पण निर्यातीची संधी मिळाली नाही.
काय आहे जीआय कायदा ९५ टक्के आंतराष्ट्रीय व्यापार हा जागतिक व्यापार संघटनेच्या देखरेखीत होतो. या संघटनेने उत्पादनांच्या निर्यातीसाठी जीआय कायदा आणला. देशात २००१ मध्ये तो स्वीकारण्यात आला. या कायद्यांतर्गत चार करारांनुसार जीआय मानांकन असलेल्या संस्थांना निर्यातीसाठी महत्त्व देण्यात येते. ही बाब जिल्ह्याचा कृषी विभाग व शेतकरी यांनी समजून घेतली.
तांदलवाडीच्या शेतकऱ्यांचा पुढाकार केळीला जीआय मानांकन मिळावे यासाठी तांदलवाडी (ता. रावेर) येथील शशांक पाटील व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी आपल्या निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाला जीआय मानांकन मिळावे यासाठी पुढाकार घेतला. मागील साडेतीन वर्षे त्यासाठी दिल्ली येथील वाणिज्य मंत्रालयांतर्गत आयोजित जीआय मानांकनच्या सुनावण्यांना हजेरी लावली. त्यासाठी रावेरातून ५० ते ५३ किलोचे केळीचे घड दिल्ली येथे न्यावे लागायचे. दाक्षिणात्य जिल्ह्यातूनही केळीला मानांकन मिळण्यासाठी अर्ज आले होते. एवढी स्पर्धा असताना जळगावच्या शेतकऱ्यांनी बाजी मारली व जीआय मिळविले. ३० डिसेंबर २०१६ रोजी त्यासंबंधीचे पत्र वाणिज्य मंत्रालयाकडून मिळाले.
१६० देशांमध्ये निर्यातजळगावची केळी व भरीताची वांगी यांची निर्यात होण्यास जीआय मानांकनामुळे चालना मिळेल. अलीकडेच आखाती राष्ट्रांमध्ये केळीची निर्यात झाली आहे. पाकिस्तानकडूनही केळीची मागणी आहे. ज्या संस्थांना जीआय मानांकन आहे त्यांच्या उत्पादनांच्या निर्यातीला जागतिक व्यापार संघटना प्राधान्य देते. जीआय मानांकन प्राप्त उत्पादन दर्जेदार, खात्रीलायक असल्याचा संकेत जागतिक व्यापार संघटनेने आपल्या व्यापारात सहभागी १६० देशांना दिला आहे. यामुळे आखाती, युरोप, आशियाई आदी १६० देशांमध्ये केळी व वांग्यांची निर्यात करता येईल.
भरीताच्या वांग्यांनाही जीआय मानांकनखान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या आसोदा ता.जळगाव येथील किशोर चौधरी व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी नवनिर्मिती शेतकरी मंडळाच्या माध्यमातून भरीताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडे नोंदणी केली. या मंडळानेही साडेतीन वर्षे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हे मानांकन मिळविले आहे. आसोदासह बामणोद, पाडळसा, भालोद भागातील भरीताची वांगी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर भरीताच्या वांग्यांची लागवड जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यांमध्ये केली जाते. त्याचे बियाणे कृषी केंद्रांवर मिळत नाही. हे बियाणे परंपरेनुसार खादीच्या स्वच्छ कापडात जतन केले जाते. वाफ्यात त्याची पावसाळ््याच्या सुरुवातीलाच रोपे तयार करतात. कांदे, भात प्रमाणे त्याच्या रोपांची लागवड केली जाते. साधारणत: ७५ ते ८० दिवसात त्याचे उत्पादन सुरू होते. जळगावचे भरीत पुणे, मुंबईतील हॉटेलमध्येही पाठविले जाते. या वांग्यांच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी त्यांनीही जीआय मानांकन मिळविले. वांग्यांनाही ३० डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे मानांकन मिळाले. जिल्हा कृषी विभागाने पुणे येथील ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टन्सीचे डॉ.गणेश हिंगमिरे यांची यासाठी मदत झाली.