श्रीरामपुरात मुलगा ठार : १४ जण जखमी : एक गाय दगावलीसंगमनेर/श्रीरामपूर : पठार भागात रविवारी रात्री तुफान वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: थैमान घातले. वादळात तब्बल २२ घरांची पडझड झाली. श्रीरामपूर येथे वादळाने उडालेला पत्रा लागून मुलगा ठार झाला. जनावरांच्या गोठ्याचे लोखंडी छत कोसळले. या दुर्घटनेत परप्रांतीय कामगारांसह एकूण १४ जण गंभीर जखमी झाले असून १ गाय दगावली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पठार भागात अचानक सोसाट्याचा वादळी वारा वाहू लागला. वादळी वाऱ्यामुळे नांदूर खंदरमाळ, बाव पठार, बिरेवाडी, शिंदोडी व मांडवे परिसरात वादळी वाऱ्यामुळे गावातील काही घरांचे पत्रे उडाले. भिंतींची पडझड झाली, जनावरांच्या गोठ्याचे छत कासळले, झाडे पडली. वीज वाहक तारा, टेलिफोनच्या तारा तुटल्या, विजेचे खांब पडले. बाव पठार येथे जनावरांच्या गोठ्याचे छत अंगावर कोसळून राजेंद्र मुरलीधर करंजेकर (वय ५५) व तुकाराम राजेंद्र करंजेकर (वय २५) हे बापलेक गंभीर जखमी झाले. तसेच १ गाय दगावली असून ४ जखमी झाल्या आहेत. करंजेकर यांच्यावर एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर बिरेवाडी येथे महावितरणच्या विद्युत मनोऱ्याची उभारणी करणारे कामगार हेमलाल महातो, कैलासराम, भोलाराम, सरजूराम, दिनेश कमाली, तातेश्वरम व गणेशराम (सर्व रा. झारखंड) यांच्या अंगावर जुन्या घराची भींत पडून सर्वजण जखमी झाले. त्यातील हेमलाल महातो व कैलासराम यांची प्रकृती गंभीर आहे. शिंदोडी व मांडवे गावात घरांचे पत्रे उडाल्याने भाऊसाहेब बिरजू कोळपे, रेवजी गोविंद ढेंबरे, दत्तात्रय भास्कर ढेंबरे, बाळू तात्याबा ढेंबरे, विठ्ठल दत्तू बनकर हे जखमी झाले. वादळात बाबासाहेब भोसले व दत्तात्रय ढेंबरे यांचे ‘पॉली हाऊस’ व रेवजी ढेंबरे यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे. देवगाव परिसरातही काही घरांचे पत्रे उडाले. शहरातील विठ्ठल मंदिरानजीकचे झाड उन्मळून पडले. घारगाव व बोटा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. वादळाने २२ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तलाठी आर. एम. मुळे, ग्रामसेवक ए. बी. कर्पे व कोतवाल बी. एम. धुळगंड यांच्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पठार भागातील मोठ्या संख्येने चिमण्यांना जीव गमवावा लागला. सर्वत्र मेलेल्या चिमण्यांचा खच लागला होता. (प्रतिनिधी)
पठारात वादळी वाऱ्याने २२ घरांची पडझड
By admin | Published: June 06, 2016 11:45 PM