अरुण बारसकर
सोलापूर : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था या खासगी दूध संघामुळे बंद पडत आहेत. २२ जिल्हा व तालुका संघ अवसायनात निघाले तर दोन बंद आहेत. गावपातळीवरील दूध पुरवठा करणाºया १५,५०३ संस्थाही कायमस्वरुपी बंद करून अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
राज्यात सहकाराचे जाळे घट्ट विणल्याचे सांगितले जात होते; मात्र मागील सात-आठ वर्षांत राज्यभरात खासगी दूध संघांची संख्या वरचेवर वाढत आहे. या खासगी दूध संघांमुळे सहकारी दूध संघ वरचेवर बंद पडले आहेत. बंद असलेल्या व अवसायनात काढण्यात आलेल्या दूध संस्थांची संख्या पाहता विदारक चित्र असल्याचे दिसत आहे. राज्यात जिल्हा व तालुका पातळीवरचे ९९ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. यापैकी २१ जिल्हा संघ तसेच ५४ तालुका दूध संघ सुरू असल्याचे सांगण्यात आले.बंद पडलेले संघरायगड, रत्नागिरी, जालना, परभणी, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली हे जिल्हा दूध संघ बंद पडल्याने अवसायनात काढले आहेत.पनवेल तालुका, भोर, कृष्णा व्हॅली, कोरेगाव, अजिंक्य, जामखेड, मालेगाव, साक्री, तळोदा, वणी, तुळजाभवानी, कन्नड, भूम, वाशी, वसंतदादा उस्मानाबाद हे तालुका पातळीवरील दूध संघ अवसायनात काढले आहेत. खामगाव व जावळी हे दोन तालुका पातळीवरील दूध संघ बंद पडले आहेत.