मुंबई - महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करून घेतील हे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदेंचे काय होणार? एकनाथ शिंदे यांनी स्वत:बरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाही अशा शब्दात रोखठोकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
रोखठोकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने म्हटलंय की, एकनाथ शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजपा स्वत:चे राजकारण करत राहील. भाजपाचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत दिसतील. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदेंचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस आणि भाजपाकडे जाईल असं त्यांनी सांगितले.
तसेच या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत. पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे. कारण, त्यांच्या चाळीस आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व साताऱ्यातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनास अवतरले. मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो. ठाण्यातील 'दिवाळी पहाट' कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले व ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली. पण, दसरा मेळाव्याबाबत शिवाजी पार्क मैदानासाठी हा नियम पाळला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे असा टोलाही ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"