सिंधुदुर्गनगरी : विविध मागण्यांसाठी आज, बुधवारी कर्मचारी संघटनांनी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. तर त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सिंधुदुर्गातील सुमारे २२ कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक किसन धनराज यांनी दिली. तर संप मोडित काढण्यासाठी शासनाने काढलेल्या कारवाईच्या फतव्याला कोणत्याही कर्मचाऱ्याने न घाबरता संपात सहभागी व्हावे, संघटना आपल्या खंबीरपणे पाठीशी आहे, असेही यावेळी स्पष्ट केले.शासनाकडून सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या पाच वर्षांत सातत्याने कामगारांच्या मागण्यांसाठी देशव्यापी संघर्ष सुरू आहे. आजपासून पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये एकूण ३७ मागण्या करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील २२ कामगार संघटना होणार सहभागीदेशव्यापी संपात व जिल्हाधिकारी भवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख, अंगणवाडी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियन, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नर्सेस फेडरेशन, नगरपरिषद कर्मचारी महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ, आशा वर्कर्स युनियन, निवारा बांधकाम कामगार संघटना, सामाजिक शालेय पोषण आहार संघ, नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज, कोकण सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कामगार संघ संपात व मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती किसन धनराज यांनी दिली. (प्रतिनिधी)
संप करण्याचा आमचा अधिकारशासनाने हा संप मोडित काढण्यासाठी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा फतवा काढला आहे; पण हा संप देशव्यापी आहे. तेव्हा कोणत्याही कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या कारवाईच्या फतव्याला घाबरून न जाता संप यशस्वी करावा. मागण्यांसाठी संप पुकारणे हा घटनेचा अधिकार आहे. त्यामुळे संपाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संपात १०० टक्के सामील व्हावे, असे आवाहन यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक किसन धनराज व एस. एन. सपकाळ यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.