मुंबई : चलनातून ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बुधवार, ९ आॅक्टोबरपासून रद्द करण्यात आल्या. पण, ज्या रुग्णांवर रुग्णालयात औषधोपाचार सुरु आहेत अशा रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून खासगी रुग्णालयांना धनादेश स्वीकारण्याचे आदेश दिले होते. जी रुग्णालये धनादेश स्वीकारणार नाहीत त्यांची १०८ आणि १०४ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. या आवाहनाला २२ जणांनी एका दिवसात प्रतिसाद दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी दिली. ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असले त्यांनी शासनातर्फे असणाऱ्या १०८ आणि १०४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वटरवरुन केले होते. त्यानंतर १०८ या क्रमांकावर १९ तर १०४ या क्रमांकावर ३ कॉल्स दिवसभरात आले असल्याचे संचालक डॉ. पवार यांनी स्पष्ट केले. अनेक खासगी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक करण्यात आली. काही ठिकाणी डिस्चार्ज देण्यास नकार देण्यात आला. तर, काही रुग्णालयांत तपासण्या लांबीवर टाकल्या. ५००, १००० च्या नोटा स्वीकारल्या नाहीतच पण धनादेश स्वीकारण्यास नकार देऊन रुग्णांच्या नातेवाईकांची कोंडी केली. त्यामुळे गेल्या बुधवारपासून काही शस्त्रक्रिया रद्द देखील झाल्या. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी रविवारी सायंकाळी खासगी रुग्णालयांनी धनादेश स्वीकारावेत असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
एका दिवसात २२ जणांनी घेतली हेल्पलाइनची मदत
By admin | Published: November 15, 2016 6:28 AM