- ऑनलाइन लोकमत/आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. 03 - लोकमंगल परिवारातील लोकमंगल फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा व अध्यात्म आदी अनेक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. याच धर्तीवर या संस्थेने मागील १० वर्षात २५ सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल २२४७ जोडप्यांचे लग्न लावून दिले आहे. यावर्षी ६ नोव्हेंबर २०१६ रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर १११ जोडप्यांंचे शुभमंगल होणार आहे.
विवाह हा एक जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. तो पार करीत असताना समाजातील सामान्य नागरिकांना विवाहाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो़ विवाहावेळी येणा-या अडचणी, नाहक होणारी पैशांची उधळण, जाचक हुंडा पध्दती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दहा वर्षापासून या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहेत. या सोहळ्यात प्रत्येक वधुवरास विवाहाचे कपडे, व-हाडी मंडळीकरिता भोजपाची सोय, मानाचा आहेर, मेकअप करण्याची व्यवस्था, वधुस मणी मंगळसुत्र व जोडावे देण्यात येतात. तसेच ताट,वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, स्टील हंडा, डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य दिले जाते.
असे झाले विवाहसोहळे
लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत केलेले विवाह सोहळे व कंसात जोडप्यांची संख्या : १ (१२१), २ (२०१), ३ (१७५), ४ (११), ५ (१८५), ६ (२०), ७ (२३२), ८ (२१), ९ (२०१), १० (५१), ११ (२१), १२ (२८२), १३ (६०), १४ (१४), १५ (१७०), १६ (६१), १७ (१०), १८ (१११), १९ (५३), २० (९४), २१ (१७), २२ (१५१), २३ (६०), २४ (०५).
सुरक्षेची काळजी
दहा वर्षापासून अविरत सुरू असलेल्या या विवाह सोहळ्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण सोहळ्यावर सी़सी़टी़व्ही कॅमेराची नजर असते़ त्याचबरोबर रक्तदान शिबीर, तातडीची वैद्यकीय सेवा, अग्निशामक दल, अम्ब्युलन्स याची वेगळी व्यवस्था सोहळयाच्या ठिकाणी करण्यात येते.
धार्मिक पर्यटन दालन
यावर्षी ६ नोव्हेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाºया सामुदायिक विवाह सोहळ्यात एक वेगळे आकर्षण असणार आहे़ यंदा सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील लोकसंस्कृती व सांस्कृतिक वारसा जपला जावा, जिल्हा पर्यटन विकसित व्हावा या उद्देशाने यासाठी प्रत्येक तालुक्यातील (पंढरपूर - विठ्ठल रूक्मिणी मंदीर, अक्कलकोट - स्वामी समर्थ मंदीर, वडवळ - नागनाथ मंदिर, माढा - माढेपुरी, माळशिरस - अकलाईदेवी, दक्षिण सोलापूर - हत्तरसंग कुडल, उत्तर सोलापूर - यमाईदेवी, मंगळवेढा - दामाजीपंत, करमाळा - कमलादेवी, सांगोला - अंबिकादेवी ) या प्रसिध्द देवस्थानांची माहिती, वैशिष्टे, छायाचित्रे या दालनात असणार आहे़ शिवाय त्या देवस्थान ठिकाणाहुन एक ज्योत सोहळस्थानी आणण्यात येणार आहे़
सुवर्ण सिध्देश्वर देखावा
यंदाच्या सोहळ्यात सिध्दरामेश्वरांची सुवर्ण मुर्ती सोलापूरात साकारण्याचा प्रयत्न सुरू आहे़ त्याला अनुसरून सुवर्ण सिध्देश्वरांची १४ फुट भव्य अशी मुर्ती मुख्य व्यासपीठावर असणार आहे़ संपूर्ण व्यासपीठ नारळाच्या जावळ्यांनी सजवले जाणार आहे़ परिसरात सोलापूरचे चार हुतात्मे यांचे पुतळे असणार आहेत़ त्यासोबतच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा बसविण्यात येणार आहे़ लोकमंगलची प्रतिकृती असलेली कासवाची भव्य प्रतिकृती सोहळा प्रांगणात असणार आहे़
नव वधु-वरांना समुपदेशन
लग्नानंतर वधु-वरांना आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर सासु-सासरे व नातेवाईक यांच्याशी कसे समरस व्हावे याबरोबरच आरोग्य जागरूकता, स्त्री भु्रणहत्या, विरोधी भावना अशा सामाजिक जाणीवांचे समुपदेशन करण्यात येते़ यासाठी डॉ़ पद्मजा गांधी, डॉ़ सुधा कांकरिया, गणेश शिंदे, ध्वनी देसाई, लोकमंगल फाउंडेशनचे रोहन देशमुख, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख आदींचा समावेश दरवर्षी असतो.
लोकमंगलचा मदतीचा हात
लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास प्रथम मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे २ हजार रूपयांची ठेव लोकमंगल फाउंडेशन व त्या मुलीच्या नावाने संयुक्त खात्यामध्ये १८ वर्षे मुदतीची ठेवण्यात येणार आहे. आजपर्यंत लोकमंगलने १२५ मुलींच्या नावे २ हजार रूपयांची ठेव ठेवली आहे. याचबरोबर शिक्षणाप्रमाणे नोकरीही दिली जाते अथवा व्यवसाय करावयाचा असेल तर बँकेमार्फत कर्जही दिले जाते.
सोहळ्यांची तयारी पूर्ण
यंदाच्या वर्षी ६ नोव्हेंबर २०१६ रोजी हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणा-या या सोहळ्यासाठी येणा-या सर्वांची चोख व्यवस्था करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी स्वागत कक्ष, कार्यालय, वैद्यकीय सेवा विभाग, रक्तदान विभाग, धार्मिक पर्यटन, भांडारगृह, स्वयंपाक गृह, भोजन विभाग, साहित्य वाटप विभाग, मेकअप वधु, मेकअप वर, समुपदेशन विभाग, स्टेज वधुवर विधी सोहळा, मुख्य विवाह सोहळा व्यासपीठ आदींची व्यवस्था व तयारी करण्यात आली आहे.