विश्वास पाटील - कोल्हापूर -‘मागेल त्याला वीज कनेक्शन’, अशी महावितरणची घोषणा असली, तरी ती किती खोटी आहे, याचा दाखला देणारा अनुभव सातारा जिल्ह्यातील करंदी (ता. जावळी) येथील शेतकऱ्यास येत आहे. विहिरीवरील वीज कनेक्शन मिळावे, यासाठी गेली २२ वर्षे ते वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यासाठीचे शुल्कही त्यांनी भरले आहे; परंतु आजअखेर त्यांना हे कनेक्शन मिळालेले नाही.‘सरकारी यंत्रणा गोरगरीब शेतकऱ्यांना कशी त्रास देते’, अशा आशयाचा प्रस्तुत बातमीदारांनी लिहिलेला लेख वाचून निकम यांनी आपल्यालाही वीज कनेक्शनसाठी कसा त्रास झाला, याची कैफियत मांडली. करंदी हे छोटेसे तीन हजार लोकवस्तीचे गाव. तिथे निकम व त्यांच्या भावाची सुमारे तीन एकर जमीन. तिला पाणी मिळाले, तर भाजीपाला करता येईल म्हणून त्यांनी १६ आॅगस्ट १९९३ ला वीज मंडळाकडे अर्ज केला. त्यासाठी १९१० रुपये मेढा येथे जाऊन अनामत भरली. तेव्हापासून २०१० पर्यंत ते वारंवार चौकशी करीत होते; परंतु त्यांना कनेक्शन मंजूर झाले नाही. अर्ज केला तेव्हा त्यांचे वय ५३ होते. आता ते ७४ वर्षांचे झाले आहेत. अजून किती वर्षे मी मंडळाचे उंबरे झिजवू हे तरी सांगा, अशी विचारणा त्यांनी अर्जात केली आहे.मेढा कार्यालयात चौकशी केल्यावर त्यांना २०१० ला सांगण्यात आले की, तुमच्या पहिल्या अर्जाची मुदत संपली आहे. त्याची अनामत रक्कम परत मिळेल; परंतु कनेक्शनसाठी नवीन अर्ज करा. त्यानुसार निकम यांनी १२ आॅक्टोबर २०११ ला ३०२५ रुपये (अर्ज क्रमांक - १०९३०१५, पावती क्रमांक - १२१६५००, ग्राहक नंबर- १९५३४००००७४४, मेढा उपविभाग - १२) परत भरले; परंतु तरीही त्यांना आजअखेर कनेक्शन मिळालेले नाहीच. शिवाय पहिल्या अर्जाची अनामत रक्कमही मिळालेली नाही. एक वीज बिल थकीत राहिले म्हटल्यावर ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची भीती दाखविणारे ‘महावितरण’ या शेतकऱ्याचे कष्टाचे १९१० रुपये देताना या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे त्यांना हेलपाटे मारायला लावत आहे. ही रक्कम व्याजासह मिळायला हवी, अशी त्यांची मागणी आहे. निकम यांच्या विहिरीपासून विजेचा खांब साठ फुटांवर आहे. त्यावर त्यांची तीन एकर शेती पाण्याखाली येऊ शकते. त्यांनी या कनेक्शनसाठी आतापर्यंत शंभरांहून जास्त वेळा येरझारा मारल्या आहेत.यासंदर्भात मेढा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता वैभव थोरवडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कनेक्शन देण्यास विलंब झाला असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘कंत्राटदाराच्या चुकीमुळे फिडर सेपरेशनचे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने कनेक्शन देण्यास उशीर झाला. त्यांनी पहिला अर्ज १९९३ ला केला, तेव्हा बहुधा टेस्ट रिपोर्ट दिला नसावा. त्यामुळे त्यांच्या पहिल्या प्रस्तावाचे शुल्क तातडीने परत देऊन नव्याने केलेल्या अर्जानुसार कनेक्शन लवकरात लवकर कसे देता येईल, असे प्रयत्न करतो.’एक हजार लाचनिकम यांना कनेक्शन लवकर मिळवून देतो, असे सांगून स्थानिक वायरमनने त्यांच्याकडून ६ डिसेंबर २०१३ ला एक हजार रुपयांची लाच घेतली. गावातच त्यांनी त्याला पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या; परंतु कामही झालेले नाही व पैसेही गेले, असा अनुभव त्यांना आला.
वीज कनेक्शनसाठी तब्बल २२ वर्षे फरफट
By admin | Published: June 12, 2015 11:02 PM