शहापूर : राज्यात अवघ्या एका वर्षात ‘आॅनर किलिंग’चे तब्बल २२० प्रकार घडल्याचे भीषण वास्तव समोर आहे आहे. राज्याच्या ग्रामीण भागांत आंतरजातीय प्रेम आणि विवाहाला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.२०१२मध्ये राज्यात २ हजार ७१२ जीवे मारण्याच्या घटना घडल्या होत्या. २०१३मध्ये २ हजार ५१२ व्यक्तींचे खून झाले होते. त्यात २०१२च्या तुलनेत ७.३७ टक्क्यांनी घट झाली होती. परंतु, पोलिसांनी केलेल्या गुन्ह्यांच्या वर्गीकरणातून सर्वाधिक बळी आॅनर किलिंगमधून गेल्याचा निष्कर्ष निघाला आहे. त्याखालोखाल वैयक्तिक वैरामुळे २०७, मालमत्तेच्या वादातून १६२, हुंडाबळी ठरलेल्या विवाहिता ८१, वैयक्तिक हितासाठी ६७ जणांच्या हत्या झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. खून झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या १ हजार ६९० तर महिलांची संख्या ८९५ आहे. वयोगटाच्या वर्गीकरणानुसार ३१ ते ५० वर्षे वयोगटातील पुरुषांची संख्या ६७३ आहे. १९ ते ३० या वयोगटातील महिला व मुलींची संख्या सर्वाधिक ४१२ इतकी नोंदविण्यात आली आहे. (वार्ताहर)
राज्यात वर्षभरात २२० आॅनर किलिंग
By admin | Published: December 02, 2014 4:33 AM