लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आल्याची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली. मात्र, सात महिने उलटून गेल्यावरही योजना लागू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या अधिकच्या खर्चासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २२२७ कोटींचा प्रस्ताव दिला असल्याचे सूत्रांनी सांगतिले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी २७ जुलैला निर्णय जाहीर केला. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी ही योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे.
या योजनेंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देण्यात आले आहे. राज्यातील १९०० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६वरून १,३५६ इतकी केली. सध्याच्या योजनेसाठी इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबासाठी ८५५ रुपये इतका प्रीमियम सरकारतर्फे दिला जातो. त्यासाठी शासन वर्षाला १,७७० कोटी रुपये देते. सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड लाखाचे कवच असलेली योजना आता पाच लाखांची करून राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विमा कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियम बदलणार आहे.