गणेश वासनिकअमरावती, दि. 24 - महसूल विभागानंतर सर्वात महत्त्वाचा गणल्या जाणा-या वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तर क्षेत्रीय वनाधिका-यांची अनेक पदे रिक्त असल्याने वन्यजीव आणि जंगल संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून बहुतांश ठिकाणी वन्यजीव व मानव संघर्षाची ठिणगीसुद्धा उडत आहे.राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अन्य विभागांच्या तुलनेत माघारलेल्या वनविभागाला फ्रंटलाइनवर आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे वनविभागातील शेकडो रिक्त पदे भरण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती पुढाकार घेत नसल्याची माहिती आहे. वेळीच दखल घेण्यात न आल्याने वनविभागात रिक्तपदांचा आलेख वाढला आहे. मोबाईल स्कॉड या अतिमहत्त्वाच्या पथकात प्रतिनियुक्तीवर नेमल्या जाणा-या पोलिसांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने राज्यात एकूण ५८ पदे रिक्त आहेत. तसेच वनजमिनींचा लेखाजोखा ठेवण्यासाठी आवश्यक भूमिअभिलेख आणि उपजिल्हाधिकारी पदेसुद्धा सद्यस्थितीत रिक्त आहेत.वनविभागाचे राज्यात प्रादेशिक (११ वनवृत्त) तर वन्यजीव विभागाचे (९ वनवृत्त) असताना जंगल, वन्यजीवांच्या संरक्षणाची प्रमुख धुरा सांभाळणारे वनपाल, वनरक्षक आणि वन परिक्षेत्राधिका-यांची सुमारे ९७० पदे रिक्त आहेत.वनविभागात तहसीलदार, पोलिसांच्या धर्तीवर आरएफओंची पदे निर्माण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हल्ली आरएफओंची ९२२ पदे कार्यान्वित असून त्यापैकी १५० पदे रिक्त आहेत. सरळसेवा आणि पदोन्नती आरएफओ पदांचे प्रमाण समान असताना राज्यात आरएफओंची पदे रिक्त आहेत. यामध्ये वनपाल संवर्गातून ६८ पदे भरावयाची असताना विभागीय पदोन्नती समितीने याबाबत तारीख अद्यापही निश्चित केलेली नाही. वनपालांना आरएफओ म्हणून पदोन्नती दिल्यास जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे सोयीचे होईल.अशी आहेत रिक्त पदेसीसीएफ (आयएफएस) ३५ पदे मंजूर असून दोन पदे रिक्त, सीएफ (आयएफएस) १८ पदे मंजूर, तर तीन पदे रिक्त, उपवनसंरक्षक (आयएफएस) १२ पदे मंजूर तर २१ पदे रिक्त, सहायक वनसंरक्षक ३१६ पदे मंजूर असून ६२ पदे रिक्त, उपजिल्हाधिकारी (प्रतिनियुक्ती) पाच पदे मंजूर, तर एक पद रिक्त, वनअभियंता १३ पदे मंजूर असून सात पदे रिक्त, आरएफओ ९९२ पदे मंजूर असून १५० पदे रिक्त, मंडळ अधिकारी (प्रतिनियुक्ती) पाच पदे मंजूर तर दोन पदे रिक्त, वनपाल ३०२५ पदे मंजूर तर ३६३ रिक्त, वनरक्षकांची ९४६१ पदे मंजूर असून ४८२ रिक्त आहेत.रिक्त पदांबाबत वरिष्ठ अधिका-यांकडून आढावा घेतला जाईल. महत्त्वाची पदभरती तातडीने केली जाईल. जंगल, वन्यजीवांचे संरक्षण वा-यावर सोडले जाणार नाही.- सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वने मंत्री महाराष्ट्र
राज्याच्या वनविभागात २२०० पदे रिक्त, वन्यजीव संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 5:15 PM