सुरेश लोखंडे,
ठाणे- जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये या पावसाळ्यात २२४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले असून, १३ संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. डेंग्यूबाबतची जनजागृती मात्र नागरिकांचे जीव जात असतानाही अद्याप कागदावरच आहे. ऐन पावसाळ्यात मलेरिया (हिवताप), डेंग्यू आणि चिकणगुन्या आजाराने जिल्ह्यात ८५४ जण त्रस्त आहेत. यामध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात असल्याचे आॅगस्टमध्ये सर्वाधिक उघडकीस आले. दगावलेल्यांमध्येदेखील डेंग्यू संशयित रुग्णांचा अधिक समावेश आहे. दगावलेल्या १३ संशयितांपैकी केवळ दोन डेंग्यूचे रुग्ण असल्याचा शोध आरोग्य यंत्रणेला घेता आला. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डासांचा शोध घेणे तर सोडाच जनजागृतीदेखील अद्याप झाली नसल्याची चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. डेंग्यूच्या चक्रव्यूहात ठाणे महापालिकेच्या मुंब्रा-कौसा, शिळफाटा परिसरातील २७ रुग्ण आहेत. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील ठाकूरवाडी, उमेशनगर, मंजूनाथनगर, तीसगांव, कोपररोड, शास्त्रीनगर, गांवदेवी या लोकवस्तीमध्ये ४१ रुग्ण आढलेले आहेत. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोन डेंग्यूचे असल्याचे उघड झाले आहेत. ठाकूरवाडी परिसरातील लोकवस्तीत तर डेेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनात आले आहे. मलेरियाचादेखील एक रुग्ण नुकताच मोहने येथे दगावला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या लक्ष्मीनगर, खदान रोड भागात २६ रुग्ण आढळले, त्यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील डेंग्यूसदृष्य रुग्ण महिनाभराच्या कालावधीपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याची वैद्यकीय क्षेत्रात ऐकायला मिळत आहे. मीरा-भार्इंदरच्या नवघर आणि मीरा रोड परिसरात २३ रुग्ण सापडलेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला. भिवंडी परिसरातील वालशिंद भागात ११ जण सापडले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मलेरियाने आझादनगरमधील एकाचे निधन झाले आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी, डोंळखांबमध्ये १०१ संशयीत रुग्ण आढळले. मलेरियाने सापगांवात एकाचा मृत्यू झाला.