लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : डायघर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील अतिशय दुर्गम भागात सुरू असलेल्या मोठ्या दारू अड्ड्यावर, ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी कारवाई केली. कमरेपर्यंत चिखल असलेल्या या भागात घुसून, पोलिसांनी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे तब्बल २२५ ड्रम रसायन हस्तगत केले. मात्र, लालचंद देवकर, संदीप देवकर आणि प्रशांत रोकड हे आरोपी पळून गेले. मोठी देसाई गावानजीकच्या अतिदुर्गम जंगलामध्ये खाडीकिनारी गावठी दारू बनवण्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार,लगेच हालचाली करून पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दारू अड्डा मुख्य रस्त्यापासून जवळपास २ किलोमीटर आत होता. अड्ड्यापर्यंत पोहोचण्यासाठी कच्चा रस्ता पार करावा लागला. कच्चा रस्ता संपल्यानंतर, खाडीकिनारी कुठे टोंगळ्यापर्यंत, तर कुठे कमरेपर्यंत चिखल होता. पोलीस अड्ड्यापर्यंत पोहोचेपर्यंत आरोपींना याची माहिती मिळाल्याने ते जंगलामध्ये पसार झाले.दारू अड्ड्यावर गावठी दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांनी भरलेले तब्बल २२५ ड्रम पोलिसांनी हस्तगत केले. ड्रमची क्षमता प्रत्येकी २०० लीटर असून, प्रत्येक ड्रममध्ये १५० लीटर नवसागर गूळमिश्रित रसायन होते. एकूण ३३ हजार ७५० लीटर कच्चे रसायन होते. याशिवाय, प्रत्येकी ५०० लीटर क्षमतेचे पत्र्याचे चार ढोल पोलिसांनी हस्तगत केले. ४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी येथून हस्तगत केला. मुंबई दारूबंदी अधिनियमान्वये शीळ-डायघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू आहे.
गावठी दारू बनवण्याचे २२५ ड्रम रसायन जप्त
By admin | Published: May 09, 2017 2:19 AM