अकोला : राज्यातील २३ विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेली मते, विजयी उमेदवारांनी पराभूत काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर मिळविलेल्या मताधिक्यापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकूण २३ मतदारसंघांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे महाआघाडीला पराभवाचा धक्का दिल्याचा ढोबळ निष्कर्ष काढता येऊ शकतो. निवडणूक निकालापूर्वी विजयाचे दावे केलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र एकाही मतदारसंघात विजय प्राप्त करता आलेला नाही.
राज्यातील एकूण १२० मतदारसंघांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त केली आहेत. त्यापैकी एका मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे, तर उर्वरित ११९ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष अथवा शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला. त्या १२० मतदारसंघांपैकी ११५ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात होते.
‘वंचित’चे उमेदवार रिंगणात नसते तर त्यांनी घेतलेली सगळी मते काँग्रेस अथवा राष्ट्रवादी उमेदवारांच्याच पारड्यात गेली असती, असे छातीठोकपणे म्हणता येत नसले तरी, आघाडीच्या कट्टर पाठीराख्यांप्रमाणेच ‘वंचित’चे पाठीराखेही भाजप व शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात असल्याने, ढोबळमानाने ‘वंचित’च्या उमेदवारांचा फटका आघाडीलाच बसल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो.‘वंचित’मुळे आघाडीला फटका बसलेले २३ मतदारसंघ विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच भागातील आहेत. मुंबई, पुणे व नागपूर या महानगरांमधील काही मतदारसंघांमध्येही ‘वंचित’च्या उमेदवारांनी आघाडीच्या उमेदवारांना हिसका दाखवला. कोकण विभागात मात्र ‘वंचित’ला तसा करिश्मा दाखविता आलेला नाही.
‘वंचित’मुळे आघाडीला फटका बसलेल्या मतदारसंघांमध्ये विदर्भातील अकोला पश्चिम, आर्णी, बल्लारपूर, चिखली, चिमूर, धामणगाव रेल्वे, खामगाव, दक्षिण नागपूर व यवतमाळ, मराठवाड्यातील गेवराई, जिंतूर, उत्तर नांदेड, उस्मानाबाद, पैठण व तुळजापूर, पश्चिम महाराष्ट्रातील दौंड, माळशिरस, पुणे कॅन्टोनमेंट व शिवाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव आणि मुंबई महानगर क्षेत्रातील उल्हासनगर, चांदिवली व चेंबूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
‘वंचित’च्या उमेदवारांनी १५ मतदारसंघांमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त मते घेतली. त्यामध्ये अकोला पूर्व, बाळापूर, मूर्तिजापूर, रिसोड, वाशिम, अकोट, सिंदखेड राजा, बुलडाणा, चाळीसगाव, साकोली, बल्लारपूर, लोहा, कळमनुरी, तुळजापूर व चांदगड या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याशिवाय आणखी २० मतदारसंघांमध्ये ‘वंचित’च्या उमेदवारांना २० हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. ‘वंचित’ने पाच आकडी मते मिळविलेल्या मतदारसंघांची एकूण संख्या ७४ एवढी आहे.आघाडी विजयापासून ‘वंचित’मताधिक्य मते१. अकोला पश्चिम २५९३ २०६८७२. आर्णी ३१५३ १२३०७३. बल्लारपूर ३३२४० ३९९५८४. चाळीसगाव ४२८७ ३८४२९५. चांदिवली ४०९ ८८७६६. चेंबूर १९०१८ २३१७८७. चिखली ६८१० ९६६१८. चिमूर ९७५२ २४४७४९. दौंड ७४६ २६३३१०. धामणगाव रेल्वे ९५१९ २३७७९११. गेवराई ६७९२ ८३०६१२. जिंतूर ३७१७ १३१७२१३. खामगाव १६९६८ २५९५७१४. माळशिरस २५९० ५५३८१५. दक्षिण नागपूर ४०१३ ५५८३१६. उत्तर नांदेड १२१०६ २६५६९१७. उस्मानाबाद १३४६७ १५७५५१८. पैठण १४१३९ २०६५४१९. पुणे कॅन्टोनमेंट ५०१२ १००२६२०. शिवाजीनगर ५१२४ १०४५४२१. तुळजापूर २३१६९ ३५३८३२२. उल्हासनगर २००४ ५६८९२३. यवतमाळ २२५३ ७९३०