मुंबई : आतापर्यंत २३ निवडणुकांचे काम केले. परंतु, या निवडणुकीत आलेला भयावह अनुभव आतापर्यंत कधीच आला नाही. एका शिक्षकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया सोमवारी मुंबईत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सुमारे ५७ हजार कर्मचाऱ्यांना झालेल्या मनस्तापाची व्यथा मांडण्यासाठी पुरेशी आहे.
मतदान केंद्रांवर पंखे नाही, पिण्यास पाणी नाही, नाष्टा, जेवण नाही इत्यादी अनंत अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांनी केला. परंतु, मतदानानंतर मशीन जमा करणे, विविध प्रकारचे फॉर्म भरणे, अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या कामातही कमालीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना घर गाठेपर्यंत पहाटेचे सहा-सात वाजले. इतका गोंधळ आजवर कुठल्याच निवडणुकीत अनुभवाला आला नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत आहेत.
महिलांनाही निवडणूक साहित्य जमा करण्याच्या नावाखाली रात्री १२ वाजेपर्यंत थांबवून ठेवले होते. विरार, वसई, कल्याण, डोंबिवली अशा लांब राहणाऱ्या महिलांना याचा त्रास झाला, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.
असह्य उकाडा, त्यात पंखेही बंदकुर्ला येथे भर उन्हात प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यातच मांडवातील पंखेही चालत नव्हते. तिथे एका कर्मचाऱ्याला चक्कर आल्याने रुग्णालयात न्यावे लागले, असा अनुभव एका कर्मचाऱ्याने सांगितला.
मतदान केंद्रावरच काढावी लागली अख्खी रात्रमतदानाच्या आदल्या दिवशीपासूनच ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका या कर्मचाऱ्यांना बसू लागला होता. रविवारी (१९ मे) सकाळी ७ वाजल्यापासून प्रशिक्षण आणि मतदान केंद्रावरील तयारीकरिता कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. काही ठिकाणी मतदानाची तयारी करण्यात उशीर झाल्याने पुरुष कर्मचाऱ्यांनी रविवारची रात्र निवडणूक केंद्रावरच काढली. मतदानाच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे मंगळवारी ५-६ वाजेपर्यंत हे हाल सुरू होते.
नाश्ता-जेवण आले, पण कुणी भलतेच घेऊन गेले- कर्मचाऱ्यांच्या नाश्ता, जेवणाकरिता एकत्रित सोय केली जाते. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून आपल्या वाट्याचे जेवण घेऊन जायचे असते. - परंतु, टिळक नगर म्युनिसिपल स्कूल येथे काम करणाऱ्या ९० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेला नाश्ता, जेवण कुणीतरी भलतेच घेऊन गेल्याने या कर्मचाऱ्यांना दिवसभर उपाशीपोटी ड्यूटी बजावावी लागली.