पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मागील आठवड्यात विदर्भात ४० टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी अद्याप तो सरासरीपेक्षा २३ टक्के कमीच आहे़ मराठवाड्यातही सरासरीपेक्षा ३ टक्के कमी पाऊस झालेला आहे़बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, २४ ते ३० आॅगस्टच्या काळात कोकण (१७३ टक्के), मध्य महाराष्ट्र (११९ टक्के), मराठवाडा (८७ टक्के) आणि विदर्भ (४० टक्के) येथे चांगला पाऊस झाला़ १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊसमानाचा विचार करता, देशात अद्याप ३ टक्के कमी पाऊस झाला आहे़ देशातील ३६ हवामान विभागांपैकी ६ विभागांत अद्याप २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ त्यात विदर्भ (-२३), पूर्व मध्य प्रदेश (- २३), पंजाब (-२०), दिल्ली (-३७), चंदीगड (- ३७), केरळ (-२१) यांचा समावेश आहे़देशातील २४ हवामान विभागात सर्वसाधारण पाऊस झाला असून त्यापैकी १२ विभागांत तो सरासरीपेक्षा कमी आहे, तर १२ विभागांत तो सरासरीपेक्षा १९ टक्क्यांपर्यंत जास्त आहे़ ६ विभागांत सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ त्यात तमिळनाडू, सौराष्ट्र, गुजरात, आंध्र किनारपट्टी, पश्चिम राजस्थान, त्रिपुरा आदी राज्यांचा समावेश आहे़
विदर्भात २३ टक्के पावसाची तूट, मराठवाड्यातही आवश्यकता; ६ विभागांत सरासरीपेक्षा जादा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 4:06 AM