लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्यातील साखर हंगाम संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची ९६ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. ८४ कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली ही रक्कम तब्बल २३ हजार कोटी आहे. राज्यात आतापर्यंत १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ‘एफआरपी’ची रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे त्यात भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा शुगर इंडस्ट्रीजचा समावेश आहे.
मार्चअखेर १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन
- राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहाेचला आहे. यंदा २०९ साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेतली होती. या कारखान्यांनी ३१ मार्चअखेर १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
- या ऊसगाळपापोटी शेतकऱ्यांना ३१ हजार १३१ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देणे गरजेचे होते. त्यात तोडणी व वाहतूक खर्चाचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत ३० हजार ७७९ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देण्यात आली. त्यात २४ हजार ४६९ कोटी शेतकऱ्यांना देय होती. त्यापैकी २३ हजार ११६ कोटी (९४.४७ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर, तर तोडणी व वाहतुकीसाठी ६ हजार ३१० कोटी रुपये मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
एवढी आहे थकबाकी- अजूनही १ हजार ३५१ कोटींची ‘एफआरपी’ देणे बाकी आहे. तर आजवरची थकीत ‘एफआरपी’ची रक्कम २ हजार १५७ कोटी इतकी आहे.