ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - कोंढव्यात प्रेमसंबंधातून एका आयटी इंजिनिअर तरुणीने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. बँगलोर येथे नोकरीसाठी असलेली ही तरूणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आली होती. प्रियकराने भेटण्यास टाळाटाळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जुही नितीन गांधी (वय 23 रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा बुद्रृक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुही गांधी हिने पुण्यातील एका नामांकित इंजिनिअरींग महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले होते. ती सध्या बेंगलोर येथील एका खासगी आयटी कंपनीत नोकरी करीत होती. महाविद्यालयातील एका मित्रासोबत तिचे प्रेमसंबंध होते. जुहीचे कुटुंब पुण्यात राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे आॅपरेशन झाले होते. त्यामुळे ती आईला पाहण्यासाठी तीन दिवसापूर्वी पुण्यात आली होती. आईला भेटून झाल्यानंतर ती मंगळवारी दुपारी कोंढव्यातील या तरुणाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. मात्र, तिच्या मित्राची बुधवारी परीक्षा होती. त्यामुळे त्याने भेटण्यास टाळाटाळ केली. तसेच, आपण नंतर भेटू असे, सांगितले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. यावादातून तिने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तिने सुसाईट नोट किंवा काही लिहून ठेवलेले नाही. पोलिसांकडून तरुणाची चौकशी सुरु आहे. त्याची बुधवारी परीक्षा असल्याने त्याला सोडण्यात आले आहे. त्याच्याकडे आणखी चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.