मुंबई : दातांवर उपचार करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका 17वर्षीय तरुणाच्या तोंडात तब्बल 230 दात आढळले. जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या चमूने तब्बल साडे सहा तास शस्त्रक्रिया करून त्या तरुणाच्या तोंडातून हे सर्व दात काढले आहेत.
बुलढाणा येथे राहणारा 17वर्षीय आशिष गवई हा दहावी इयत्तेमध्ये शिकत आहे. काही दिवसांपूर्वी आशिषचा उजवा गाल आणि गालाची खालची बाजू सुजली. मात्र त्याला दुखत नव्हते. यामुळे त्याने याकडे जास्त लक्ष दिले नाही. मात्र काही दिवसांनी तो गाल जास्तच सुजला आणि त्यामुळे त्याचा चेहरा थोडा वेगळा दिसू लागला. असे झाल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला डेंटिस्टकडे नेले. आशिषची तपासणी केल्यावर त्यांना काहीतरी वेगळे झाले असल्याचे लक्षात आले. म्हणून त्या डॉक्टरांनी आशिषला मुंबईच्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. बुलढाण्यावरून दोन दिवसांपूर्वी आशिषला जे.जे. रुग्णालयात आणण्यात आले.
आशिषच्या जबडय़ाच्या खालच्या बाजूला सूज दिसत होती. त्याची तपासणी केल्यावर उजव्या बाजूची खालची अक्कलदाढ आणि त्याच्या पुढची दाढ त्याला नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. मग हिरडीच्या आतल्या बाजूला नक्की काय झाले आहे हे पाहण्यासाठी एक्सरे काढण्यात आला. यामध्ये आतमध्ये अनेक दातांची वाढ झाल्याचे दिसून आले. या एक्सरेमध्ये एका खडय़ासारखे काहीतरी दिसून आले. यामुळे सिटीस्कॅन करण्यात आला. यामध्ये तिथे टय़ुमर झाल्याचे दिसून आले. मात्र हा साधाच टय़ुमर होता.
सोमवार, 21 जुलै रोजी आशिषवर सकाळी 11च्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. ही शस्त्रक्रिया संध्याकाळी साडे पाच वाजेर्पयत चालू होती. बाहेर काढण्यात आलेल्या दातांपैकी 23क् दात आम्ही मोजले, असे डॉ. थोराडे यांनी सांगितले. डॉ. सुनंदा धिवरे आणि डॉ. थोराडे यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.
आशिषची अक्कलदाढ अक्कलदाढेच्या जागी न येता जबडय़ाच्या हाडामध्ये येत होती. मात्र या वेळी त्याचा एकच दात तयार न होता, अनेक छोटे-छोटे दात तयार झाले. यांची वाढ होत असतानाच एक मांसाच्या गोळ्याने टय़ुमर तयार झाला. मात्र हा साधाच टय़ुमर होता. आशिषची शस्त्रक्रिया करताना त्याच्या जबडय़ाची दोन्ही हाडे वाचवण्यात यश आले असल्यामुळे त्याचा चेहरा नीट राहिला आहे.