ऑनलाइन लोकमत
परभणी, दि.8 - राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शासनाने ओबीसी महामंडळाला विविध विकासात्मक योजना राबविण्यासाठी अर्थसंकल्पात २३८४ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती जलसंधारण तथा ओबीसी खात्याचे मंत्री राम शिंदे यांनी दिली.
परभणी जिल्हा धनगर समाजाच्या वतीने ८ जून रोजी येथील बी.रघुनाथ सभागृहात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड.हरिभाऊ शेळके तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.रामराव वडकुते, मारोतराव बनसोडे, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, विठ्ठलराव रबदडे, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विलास लुबाळे, रामकिशन रौंदळे, सुरेश भूमरे, करुणाताई कुंडगीर, कंठाळूमामा शेळके, मारोतराव पिसाळ, तुकाराम साठे आदींची उपस्थिती होती.
शिंदे म्हणाले, कोणत्याही चळवळीचा उगम परभणी जिल्ह्यातून होतो. त्याच प्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाची चळवळ याच जिल्ह्यातून उभी टाकली आहे. आघाडी शासनाने मागील ७० वर्षाच्या काळात धनगर समाजाला खेळवत ठेवले. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर या समाजाचा आर्थिकस्तर उंचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजाला अनुुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु आहे. डिसेंबर अखेरपर्यंत आरक्षण लागू होईल. तसेच समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचे काम मी करणार आहे. याच हेतुने ओबीसी महामंडळाला २३८४ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतरच आपण या महामंडळ विभागाचे मंत्रीपद स्वीकारले. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ओबीसी महामंडळ विभागाच्या मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातच माझा सत्कार झाला. तो ही सर्व पक्षीय नेत्यांनी पुढे येऊन हा सत्कार केल्याने ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. या सत्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखीच वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.