मुंबई : यंदाचा मेगाब्लॉक असलेला रविवार रेल्वे प्रवाशांसाठी घातवार ठरल्याचे समोर आले आहे. शहर आणि उपनगरीय लोकल मार्गावर २२ फेब्रुवारी रोजी तब्बल २४ अपघात झाले असून, यामध्ये १३ प्रवासी ठार झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेने ठरवून दिलेल्या सरासरीपेक्षा अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २२ फेब्रुवारी रोजी बोरीवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद तसेच हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. रेल्वे पोलिसांनुसार, रविवारी झालेल्या २४ अपघातांत १३ प्रवासी ठार झाले असून ११ प्रवासी जखमी झाले आहेत. यात दादर, वांद्रे, बोरीवली, ठाणे, पनवेल स्थानकांदरम्यान प्रत्येकी दोन प्रवासी ठार झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे आहे. तर कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि पालघर येथे प्रत्येकी एक असे तीन प्रवासी ठार झाले आहेत. (प्रतिनिधी)
मेगाब्लॉकच्या दिवशी तब्बल २४ अपघात
By admin | Published: February 24, 2015 4:26 AM