नागपूर : केंद्र सरकार लवकरच २० ते २४ कोळसा खाणींचा लिलाव करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील निर्णय पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी रविवारी दिली. वेकोलितर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.स्वरूप म्हणाले की, कोळसा मंत्रालयाने लिलावासाठी १६ खाणींची निवड केली असनू, आणखी ४ ते ८ खाणींची निवड लवकरच करण्यात येणार आहे. या २० ते २४ खाणींचा लिलावासंबंधीचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने ज्या २०४ कोळसा खाणींच्या लिलावावर प्रतिबंध लावण्यात आले होते़ त्यापैकी आतापर्यंत ६७ खाणींचा लिलाव करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या माध्यमातून ३ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, ५९ हजार कोटी रुपयांचे पॉवर टॅरिफचीसुद्धा बचत झाली आहे. खाणींच्या लिलावाची प्रक्रिया ही महसूल वाढविण्याच्या उद्देशाने तर डिझाईन करण्यात आली आहेच परंतु ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध करण्याचाही उद्देश समोर ठेवला आहे. त्यामुळे ही लिलावाची प्रक्रिया ‘युनिक’ आहे. सध्याच्या ४९४ मिलियन टन कोळसा उत्पादनाच्या तुलनेत २०२० पर्यंत १ हजार मिलियन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य आहे. परंतु एखादे मोठे लक्ष्य प्राप्त करण्याचा विचार करेपर्यंत काहीही प्राप्त करता येऊ शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, देशाचा विकासदर ८ टक्के ठेवण्यासाठी भारताला २०२० पर्यंत १२०० मिलियन टन कोळशाची गरज भासणार आहे. त्या दृष्टीने सरकारने कोळसा उत्पादनाची योजना आखली आहे. खासगी कोळसा संस्थेकडून पुढील पाच वर्षांत ५०० टन कोळसा उत्पादनाची अपेक्षा केली जात आहे.(प्रतिनिधी)
२४ कोळसा खाणींचा लिलाव लवकरच
By admin | Published: April 20, 2015 2:12 AM