मुंबई: नाकाबंदीदरम्यान आझाद मैदान पोलिसांनी मंगळवारी रात्री एका कारमधून तब्बल २४ लाखांची रोकड जप्त केली. यामध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याने ही रक्कम कोणासाठी आणली होती, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली आहे. तर चेंबूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याकडून साडेएकतीस हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली.मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंगळवारी मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आली होती. त्यानुसार आझाद मैदान पोलिसांनी बॉम्बे जिमखाना परिसरातील फॅशन स्ट्रीट येथे नाकाबंदी लावली होती. गाड्यांची तपासणी सुरू असताना या ठिकाणी (एमएच०४ डीजे ७३०७) इनोव्हा कार आली. पोलिसांनी ही गाडी अडवून गाडीची तपासणी केली असता पोलिसांना सीटखाली एक बॅग आढळून आली. पोलिसांनी तत्काळ बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये पोलिसांना २४ लाखांची रक्कम आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी कारचालक राजेंद्र भारद्वाज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने योग्य पुरावे सादर न केल्याने ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून, आयकर विभाग त्याची अधिक चौकशी करीत आहे. (प्रतिनिधी)
फॅशन स्ट्रीट परिसरातून २४ लाख जप्त
By admin | Published: October 16, 2014 5:18 AM